औरंगाबाद : शिवसेना नेते तथा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आज औरंगाबादेत अंबादास दानवे यांच्यावतीने आयोजित केलेल्या हिंदूहृदयसम्राट चषकाचे उद्घाटन करायला आले होते. यावेळी त्यांनी शिंदे गटावर चांगलीच फटकेबाजी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याठिकाणी आले असते तर आम्ही ही मॅच आधीच खेळली. आम्ही षटकार आधीच मारला असे म्हणाले असते, अशा शब्दात त्यांनी शिंदे यांना टोला लगावला. शिंदे गटाला बाळासाहेब ठाकरे यांच्यातील चित्र अनावरणानंतर बुद्धी येऊ द्या, त्यांना त्यांची चूक कळू देत अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर हल्ला चढवला. तसेच काही लोकांच्या राक्षसी महत्वाकांक्षेमुळे राज्य मागे जात आहे, असेही आदित्य ठाकरे म्हणाले. यावेळी त्यांनी उद्घाटन करताना क्रिकेटच्या पिचवर बॅटिंगही केली.
विधिमंडळामध्ये उद्या बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण केले जाणार आहे. २३ जानेवारी हा बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस आहे. याबाबत विचारलं असता आदित्य ठाकरे म्हणाले, जे लोकं अनावरण करत आहेत त्यांच्या मनातून गद्दारीची भीती दूर जावी. सुरत, गुवाहाटीला पळणाऱ्यांची भीती दूर व्हावी. राक्षशी महत्त्वाकांशेपोटी काय करून ठेवलं हे त्यांच्या लक्षात यावं, असा घणाघात आदित्य ठाकरे यांनी केला.
शिवशक्ती-भीमशक्ती एकत्रीकरणावर आदित्य ठाकरे म्हणाले, हे दोन्ही पक्ष एकत्र येणे गरजेचे आहे. महाराष्ट्राचा आवाज वाढविण्यासाठी, सगळ्या समाजाला एकत्र करण्यासाठी ही युती आवश्यक आहे.
दाओस कंपन्यांसोबत एमओयू झाला. त्यात तीन कंपन्या महाराष्ट्रातील असल्याचं समोर आलं. याची सर्व माहिती मी काढणार असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले. त्यानंतर पत्रकार परिषद घेणार असल्याचंही ते म्हणाले.
जे गेलेत त्यांना डिसक्वालीफाय होणारचं आहेत. कायद्यात त्यांना वाचविण्यासाठी तरतूद नाही. न्याय हा मिळणार आहे. निवडणुका जवळ आल्यावर सर्व कळेल. जे गद्दार झाले त्यांना व्हीआरएस घ्यायला लावला आहे. त्यांना कुठल्याही सीट मिळणार नाही, असा आरोपही आदित्य ठाकरे यांनी केला.