मुंबई : अजित पवार यांनी शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. याशिवाय छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मरावबाबा अत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे आणि अनिल पाटील यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. शिंदे, भाजप सरकारमध्ये पहिली महिला मंत्री म्हणून अदिती तटकरे यांनी शपथ घेतली आहे. महिला मंत्री नाही म्हणून शिंदे-भाजप सरकारवर जोरदार टीका करण्यात येत होती.
आजच्या शपथविधीला राष्ट्रवादी काँग्रेसचा अधिकृत पाठिंबा नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्पष्ट करण्यात आले आहे. सर्व पदाधिकारी आणि आमदार राष्ट्रवादी काँग्रेससोबत असे शरद पवार यांच्याकडून सांगण्यात आले. आजचा शपथविधी हा लोटस ऑपरेशन असल्याचंही राष्ट्रवादी काँग्रेसकडून सांगण्यात आलंय. ज्यांनी शपथ घेतली ती त्यांची वैयक्तिक भूमिका असल्याचंही शरद पवार यांनी म्हंटलं.
आजच्या शपथविधीला अजित पवार यांच्यासोबत असलेल्यांचा हा वैयक्तिक निर्णय असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्पष्ट करण्यात आलंय. अजित पवार यांच्यासोबत ३० ते ४० राष्ट्रवादीचे आमदार सोबत आहेत. तरीही हा ऑपरेशन लोटसचा भाग असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्पष्ट करण्यात आलंय.
संजय राऊत यांनी ट्वीट केलं. मी शरद पवार यांच्याशी बोललो. मी खंबीर आहे, असं सांगितल्याचं ट्वीट संजय राऊत यांनी केलं. काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. आपल्या सगळ्या नेत्यांवर दबाव आहे, असं शरद पवार यांनी सांगितलं होतं. त्यामुळं आजही ही भूमिका येणं स्वाभाविक असल्याचंही संजय राऊत यांनी ट्वीटमधून म्हटलं.
अदिती तटकरे या सुनील तटकरे यांची मुलगी आहे. अदिती या राज्याच्या उद्योग, खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा आणि युवक कल्याण, या विभागाच्या २०१९ मध्ये राज्यमंत्री होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर त्या श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून निवडून आल्या आहेत. त्यांचे शिक्षण एमपर्यंत झाले आहे. गेल्या वर्षभरापासून राज्यात महिला मंत्री नसल्याचा ठपका विरोधक शिंदे-भाजप सरकारवर ठेवत होते. आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या अदिती तटकरे यांची पहिल्या महिला मंत्री म्हणून शिंदे-भाजप सरकारमध्ये शपथ घेतली.