प्रदीप कापसे, प्रतिनिधी, नवी दिल्ली | 7 March 2024 : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने आता पंख विस्तारले आहेत. अजितदादांच्या नेतृत्वात पूर्वोत्तर राज्यात सुद्धा मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट अरूणाचल प्रदेशात लोकसभेसह विधानसभा निवडणूक लढवणार आहे. याविषयीची बैठक देवगिरीवर पार पडली आहे. काल रात्री मुंबईत अरुणाचल प्रदेशच्या प्रदेशाध्यक्षांनी अजित पवार आणि प्रफुल पटेलांची भेट घेतली. या राज्यात विधानसभेच्या ६० जागा आहेत. पक्ष आणि चिन्ह मिळाल्यानंतर अजित पवार राज्याबाहेर पहिल्यांदाच निवडणूक लढवणार आहेत.
राष्ट्रीय पक्षासाठी तयारी
राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळविण्यासाठी अजित पवार गट सक्रिय झाला आहे. स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याची प्रवक्ते ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी टीव्ही ९ मराठीला माहिती दिली आहे. अरुणाचल प्रदेश लोकसभेसाठी भाजपने केंद्रीय मंत्री किरण रिजीजू यांना उमेदवारी दिली आहे. पण तरीही लोकसभेसाठी अजित पवार गटाने मोर्चेबांधणी सुरु केली आहे. राष्ट्रीय पक्षासह इतर राज्यात पाळंमुळं घट्ट करण्यासाठी अजित पवार गट कामाला लागला आहे.
2 जागांसाठी मोर्चे बांधणी
अजित पवार गट अरुणाचल प्रदेशातील लोकसभेच्या दोन जागांसाठी आग्रही असल्याचे समजते. पण किरण रिजीजू यांना एका मतदार संघातून उमेदवारी मिळाल्याने आता अजित पवार गट लोकसभेची निवडणूक खरंच लढवणार आहे का, असा प्रश्न उभा ठाकला आहे. स्थानिक नेते निवडणुकीसाठी आग्रही आहेत. पण महायुतीतील घटक पक्ष असल्याने अजित पवार गटाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
विधानसभेच्या रिंगणात उतरणार
लोकसभेसह अजित पवार गट विधानसभेची पण तयारी करत आहे. अरुणाचल प्रदेशात विधानसभेच्या ३० जागा आहेत. त्यातील अर्ध्यांहून अधिक जागांवर हा गट आग्रही आहे. त्यातील अनेक जागा निवडून आणू असा दावा स्थानिक नेत्यांनी केला आहे. त्यामुळे अरुणाचल प्रदेशात राष्ट्रवादीच्या घड्याळाचे काटे कोणाला बोचतात हे लवकरच स्पष्ट होईल. पण राष्ट्रवादी अजित पवार गटाने राज्याबाहेर पंख विस्तारण्याचे धोरण स्वीकारल्याने भाजपला पण अडचण होऊ शकते.