लोकसभा निवडणुकीच्या निकालाने महायुतीच्या भवितव्यावर पण प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. महायुतीत सर्व काही आलबेल नसल्याचे महायुतीमधील नेत्यांच्या वक्तव्याने स्पष्ट झाले आहे. शिंदे सेना आणि अजितदादा गटाचा या निवडणुकीत भाजपला काहीच फायदा झाला नसल्याचा सूर आळवण्यात येत आहे. तर दुसरीकडे भाजपमधील नेत्यांच्या बेताल वक्तव्याचा अजित पवार गटाला फटका बसल्याचा पलटवार करण्यात आला आहे. त्यामुळे पराभवाचे खापर फोडण्यावरुन महायुतीत ठिणगी पडल्याचे चित्र आहे.
अजित पवार गटावर खापर
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे इंग्रजी मुखपत्र द ऑर्गनायझरने पहिल्यांदा अजित पवार गटावर तोफ डागली. निकालानंतर लागलीच भाजपला आरसा दाखविण्यात आला. अजित पवार गटाला सोबत घेतल्यानेच महाराष्ट्रात भाजपला पराभवाचे तोंड पाहायला लागल्याचा आरोप करण्यात आला. भाजपने त्यांना सोबत घेऊन किंमत कमी केल्याचे म्हटल्या गेले. आता विधानसभेपूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे डॅमेज कंट्रोलची जबाबदारी देण्यात आली आहे.
राष्ट्रवादीकडूनही हल्लाबोल
महायुतीत आम्ही ज्या विकासाच्या मुद्यावर लोकांची कामं करण्यासाठी म्हणून गेलो. संघाच्या बैठकीत जी काही चर्चा ती त्यांची अंतर्गत आहे.
मात्र अजित दादांना घेऊन त्यांचं काही नुकसान झालं नाही. पण भाजपवरची जी काही नाराजी आहे त्याचा फटका अजित पवारांना बसला हे म्हणणं योग्य असल्याचा भीमटोला रुपाली पाटील यांनी काल हाणला.
संघाच्या मुखपत्रात कोणीतरी लेख लिहला. त्यानंतर सातत्याने अजित पवारांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न राज्यात सुरु झाला आहे. भाजपच्या एका बैठकीत सुद्धा काही नेत्यांनी भाजपच्या पराभवाचे खापर अजित पवारांवर फोडलं आहे. जर अशाप्रकारे अजितदादांना जाणीवपूर्वक लक्ष्य केलं जात असेल तर आम्हाला निश्चित वेगळा विचार करावा लागेल, अशी प्रतिक्रिया आमदार अमोल मिटकरी यांनी टीव्ही ९ मराठीशी बोलताना दिली.
सुनील तटकरे यांची पहिली प्रतिक्रिया
तर या सर्व वादावर सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महायुतीतील पक्षांबाबत बोलताना पक्षाध्यक्षांची परवानगी घ्यावी, अशी सक्त ताकीद अमोल मिटकरी यांना दिल्याचे तटकरे म्हणाले. राजकीय भाष्य करण्यापूर्वी मिटकरी यांनी परवानगी घेण्याची ताकीद त्यांना देण्यात आल्याचे प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी स्पष्ट केले. काही मंडळी महायुतीत बेबनाव असल्याचा मुद्दामहून प्रचार करत असल्याचा आरोपही तटकरे यांनी केला.