मुंबई : जीएसटीची (GST) ही रक्कम आत्ताची नाही. त्या रकमेचा इतर बाबींशी संबंध कसा काय लावता, असा सवाल करत राज्यानेही जेवढे शक्य होते तितके पेट्रोल-डिझेलचे दर कमी केले, असे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले. ते मुंबईत बोलत होते. केंद्र सरकारकडून जीएसटीच्या आलेल्या रकमेविषयीची सविस्तर आकडेवारीच त्यांनी यावेळी वाचून दाखवली. केंद्र सरकारने जीएसटीचे पैसे दिले, आता पेट्रोल डिझेलचे दर कमी करा, असे भाजपाने म्हटले होते. त्यावर विचारले असता अजित पवारांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, की पेट्रोल-डिझेलच नाही, तर सीएनजीदेखील (CNG) आम्ही साडे तेरा टक्क्यांनी कमी केला. तो आता तीन टक्क्यांवर आणला आहे. साडे तीन हजार कोटी रुपयांचा राज्य सरकारच्या तिजोरीवर येणारा ताण नागरिकांच्या सुविधेसाठी आपण सोसला आहे, असेही ते म्हणाले. यात एक हजार कोटी गॅसचे दर दोन रुपया आणि एक रुपया 45 पैसे पेट्रोल डिझेल याचा समावेश आहे.
जीएसटीची आकडेवारी सादर करताना अजित पवार म्हणाले, की मार्च 2022पर्यंत महाराष्ट्र सरकारकडे येणारी जीएसटीची रक्कम ही 29 हजार 647 कोटी रुपये होती. त्यापैकी केंद्र सरकारने दोन दिवसांपूर्वी वेगवेगळ्या राज्यांची 21 राज्यांची 86 हजार 912 कोटी रक्कम रिलीज केली. राज्याचे 14 हजार 145 कोटी आपल्याला मिळाले. अजून येणे असणारी रक्कम 15 हजार 502 कोटी रुपये आहे. जेव्हा जीएसटी आला त्यावेळी असे सांगण्यात आले होते, की मार्च 2022पर्यंत कमी पडणारी रक्कम राज्यांना दिली जाईल. त्यानुसार 15 हजार 502 कोटी आपल्याला येणे बाकी आहे. ती रक्कम मिळावी म्हणून पाठपुरावा केला जाईल. त्याचा विकासकामांसाठी वापर करता येईल, असे अजित पवार म्हणाले आहेत.
जीएसटी परताव्याबाबत सातत्याने केंद्र सरकारकडे बोटे दाखवून जनतेची दिशाभूल करत ठाकरे सरकार आपल्या आर्थिक नियोजनातील ढिसाळपणाचे प्रदर्शन घडवू लागले आहे. जीएसटीचा मे महिन्यापर्यंतचा संपूर्ण परतावा केंद्राकडून मिळालेला असल्याने आता आकड्यांचा फसवा खेळ न करता पेट्रोल आणि डिझेवलरील राज्याचे कर 50 टक्क्यांनी कमी करून जनतेला दिलेले वचन पूर्ण करा, असे भाजपाने म्हटले आहे.