मुंबई : अजित पवारांनी चर्चा खोट्या ठरवल्या असल्या तरी काही प्रश्न अनुत्तरित आहेत. अजित पवारांचा दावा खरा असला तरी घडलेल्या काही घडामोडींच्या चर्चा कायम आहेत.
अजित पवारांनी सत्तेत किवा भाजपसोबत जाण्याच्या सर्व चर्चा फेटाळल्या. मात्र काही प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत. ज्यावरुनच सत्ताधारी बोट ठेवतायत. अजित पवार म्हणाले की राष्ट्रवादीचे काही आमदार मुंबईत येण्यामागे त्यांच्या काही विकासकामांचं काम होतं. पण पहाटेच्या शपथेवेळी राष्ट्रवादीचे जे आमदार पवारांसोबत गेले होते, बऱ्यापैकी तेच आमदार यावेळी मुंबईत होते.
यावेळी अजितदादांना मुंबईत भेटायला आमदारांमध्ये अमळनेरचे आमदार अनिल पाटील, वरुड मोर्शीचे देवेंद्र भुयार, परळीचे धनंजय मुंडे, करमाळ्याचे संजयमामा शिंदे, कळवणचे नितीन पवार, पिंपरीचे अण्णा बनसोडे, चिपळूणचे शेखर निकम आणि अहेरीचे धर्मरावबाबा आत्राम यांचा समावेश होता.
दाव्यानुसार जर आमदार कामानिमित्त आले होते., तर मग काल माणिकराव कोकाटे आणि अण्णा बनसोडेंनी आम्ही अजित पवारांसोबत आहोत, अशी जाहीर विधानं का केली. दुसरा प्रश्न धनंजय मुंडे काल नॉट रिचेबल झाले. तेव्हापासून ते थेट मुंबईतच अजित पवारांसोबत दिसले. एरव्ही नेहमी फोनवर उपलब्ध होणारे मुंडे नॉट रिचेबल का झाले होते?
शंकेचं वातावरण संपूर्ण पक्षाभोवती तयार झालं होतं. अशावेळी अजित पवारांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ज्येष्ठ नेते छगन भुजबळांसारख्या नेत्यांना सोबत घेऊन शंकांचं निरसन का केलं नाही.
ज्या अजित पवारांवर टीका करुन शिंदे गट मविआतून बाहेर पडला., तेच अजित पवार सत्तेत आले तर शिंदे गटाच्या भूमिकेवरही प्रश्न उभं राहिल. आधी शिवसेना आणि नंतर राष्ट्रवादी फोडल्याचा आरोपही भाजपवर होईल, असं असतानाही जर चर्चा खोट्या होत्या तर मग शिंदे गट आणि भाजपनं त्या चर्चांना खतपाणी का घातलं. साऱ्या चर्चांना पूर्णविराम मिळालाय की मग हा स्वल्पविराम आहे. यासाठी सुप्रीम कोर्टाच्या निकालाचीच वाट पाहावी लागेल.