Chandrayaan 3 | चांद्रयान 3 मोहिमेचं महाराष्ट्र कनेक्शन काय? अजित पवार यांनी सांगितलं

| Updated on: Aug 23, 2023 | 8:16 PM

Ajit Pawar On chandrayaan 3 | भारताची 'चांद्रयान 3' मोहिम फत्ते झाली आहेत. या चांद्रयान 3 मोहिमेत महाराष्ट्राचं योगदान कसं होतं हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं.

Chandrayaan 3 | चांद्रयान 3 मोहिमेचं महाराष्ट्र कनेक्शन काय? अजित पवार यांनी सांगितलं
Follow us on

मुंबई | अंतराळात भारताने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. भारताची चांद्रयान 3 मोहिम यशस्वी ठरली आहे. चांद्रयान 3 चंद्रावर यशस्वी लँडिंग झालं आहे. शास्त्रज्ञांच्या मेहनतीला यश आलं. या ऐतिहासिक कामगिरीनंतर भारतीय शास्त्रज्ञांचं सर्वच स्तरातून कौतुक केलं जात आहे. इस्त्रोच्या शास्त्रज्ञांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉलद्वारे अभिनंदन केलं. तसंच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इस्त्रोच्या शास्त्रज्ञांचं कौतुक केलं. तसेच चांद्रयान 3 मोहिमेत महाराष्ट्राचं कसं योगदान राहिलं हे देखील सांगितलं.

अजित पवार काय म्हणाले?

“चांद्रयान 3 मोहिमेचं यश हे इस्त्रोचे शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ आणि अधिकाऱ्यांसह समस्त देशवासियांच्या एकजुटीचं यश आहे, असं आपण ज्यावेळेस आपण म्हणतो. तसं या मोहिमेत तुमच्या आमच्या राज्यातील मुंबई, जळगाव, बुलडाणा वालचंदनगर, सांगली आणि जुन्नर या शहरांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. कारण भारत गेल्या अनेक वर्षांपासून अंतराळातील महाशक्ती म्हणून कार्यरत होता. पण आजच्या चंद्रमोहिमेच्या यशामुळे शिक्कामोर्तब झाला आहे”, असं अजित पवार म्हणाले.

हे सुद्धा वाचा

चांद्रयान 3 मोहिमेत महाराष्ट्राचं योगदान

“मुंबईतील गोदरेज एरोस्पेसमध्ये यानाचे काही भाग बनवण्यात आले. सांगलीत रॉकेटच्या पार्टना कोटींग करण्यात आलं. पुण्यातील कंपनीत फ्लेक्स नोझल आणि बुस्टर तर, जळगावात एचडी नोझल्स तयार करण्यात आले. बुलडाण्यातील खामगावाची चांदी आणि थर्मल फॅब्रिक चांद्रयानासाठी वापरण्यात आले. पुण्यातील जून्नरच्या दोन शास्त्रज्ञांनी मोहिमेत प्रत्यक्ष सहभाग नोंदवला. इंदापूरची वालचंद इंडस्ट्री गेली पन्नास वर्षे इस्त्रोच्या प्रत्येक मोहिमेत योगदान देत आहे. ‘चांद्रयान-३’च्या यशस्वी मोहिमेत महाराष्ट्राचंही मोठं योगदान असून तेही कायम लक्षात ठेवलं जाईल”, असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चांद्रयान 3 मोहिमेतील महाराष्ट्राचं योगदान नमूद केलं.

भारत चौथा देश

दरम्यान भारत दक्षिण ध्रुवावर सेफ लँडिंग करणारा पहिलाच देश ठरला आहे. तसेच भारत अमेरिका, रशिया आणि चीननंतर चंद्रावर सेफ लँडिग करणारा चौथा देश ठरला आहे.

चांद्रयान 3 मोहिमेचे शिलेदार

पी वीरामुथवेल, मोहन कुमार, कल्पना, एस उन्नीकृष्णन नैय्यर, ए राजराजन आणि एम शंकरन यांनी चांद्रयान 3 मोहिम यशस्वी करण्यात मोलाची भूमिका बजावली.