पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कॅबिनेटमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला स्थान न मिळाल्याने त्याची मोठी चर्चा झाली. तर दुसरीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून अजित पवार यांना सोबत घेतल्याने निवडणुकीत फटका बसल्याचा हल्लाबोल झाला. त्यामुळे नाराजी वाढली होती. लोकसभेत अजित पवार गटाला एक जागा मिळाली आहे. त्या आधारावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात प्रफुल्ल पटेल यांना राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) ऑफर देण्यात आली होती. पण ही बोळवण असल्याचे लक्षात येताच, ज्येष्ठतेचे कारण देत अजित पवार गटाने त्याला नकार दिला होता. यापूर्वी कॅबिनेट पदी काम केल्यानंतर राज्यमंत्री पद काम करणे योग्य नसल्याचे प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केले होते.
अजित पवारांची नाराजी दूर करणार
अजित पवार गट नाराज असल्याचे समोर आल्यानंतर भाजपने ही नाराजी दूर करण्यासाठी एक फॉर्म्युला शोधला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या रिक्त झालेल्या जागेवर राज्यसभेची पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीसाठी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी अर्ज भरला. त्यांना संसदेत मागील दाराने पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला.
यापूर्वी एका जागा भाजप कोट्यातून देणार असल्याची चर्चा होती. भाजप कोट्यातून राष्ट्रवादीचा एक नेता राज्यसभेवर पाठविण्याची चर्चा रंगली होती. सुनेत्रा पवार यांचा अर्ज प्रफुल्ल पटेल यांच्या रिक्त झालेल्या जागी भरण्यात आला आहे. त्यामुळे एका जागेचा सस्पेन्स कायम आहे. त्यावर पक्षातंर्गत नाराज नेत्याला पाठविण्याची तर तयारी करण्यात येत नाही ना? राज्यात भाजपच्या राज्यसभेच्या दोन जागा रिक्त झाल्या आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, त्यातील एक जागा कदाचित राष्ट्रवादीच्या पारड्यात पडू शकते. पीयूष गोयल हे लोकसभेत गेल्याने त्यांच्या रिक्त जागेसंबंधीची ही शक्यता वर्तविण्यात येत आहे.
दोन नेते जातील राज्यसभेत
राष्ट्रवादी स्थापना दिवसाचा कार्यक्रम नुकताच झाला. अजित पवार यांनी यावेळी राज्यसभेसंबंधी एक वक्तव्य केले. त्याकडे अनेकांचे लक्ष वेधले गेले. आमच्या पक्षाचे दोन नेते राज्यसभेत जातील, असे अजित पवार म्हणाले होते. राज्यसभेवर सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर आता दुसरी व्यक्ती कोण? असा सवाल विचारण्यात येत आहे. छगन भुजबळ नाराज असल्याचे बोलले जाते. त्यांनी मात्र नाराज नसल्याचे वक्तव्य केले आहे. त्यामुळे राज्यसभेसाठी दुसरे नाव कुणाचे असेल याची उत्सुकता आहे.