अजित पवार यांच्या कालच्या धावत्या दिल्ली दौऱ्याचे पडसाद राज्यातील राजकारणात उमटत आहे. मध्यरात्री अजित पवार यांनी त्यांच्या सहाकाऱ्यांसह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये खलबतं झाली. त्यावेळी त्यांच्या सोबत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल हे पण उपस्थित होते. रात्री एक वाजता ही भेट झाल्याने राज्यात अनेकांचा भुवया उंचावल्या आहेत. ही चर्चा 40-45 मिनिटं चालली. इतक्या मध्यरात्री झालेल्या या भेटीत काय घडामोड घडली याविषयीची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. अवघ्या सात तासांच्या या दौऱ्याने राज्यात एकच चर्चा रंगली आहे.
रात्री 1 वाजता घेतली भेट
सध्या संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. दिल्लीत पण मोठ्या घडामोडी घडत आहेत. त्यातच आता मध्यरात्री अजित पवार यांच्या धावत्या दौऱ्याने राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला. रात्री एक वाजता त्यांनी अमित शाह यांची भेट घेतली. 40-45 मिनिटं ही भेट झाली. दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. तर सकाळी 8 वाजता अजितदादा हे मुंबईत हजर होते. त्यांच्यासोबत सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे पण उपस्थित असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
जागा वाटपाविषयी चर्चा?
अमित शाह हे नुकतेच राज्याच्या दौऱ्यावर येऊन गेले. पुण्यात त्यांनी विधानसभेसाठी रणशिंग फुंकले. यावेळी त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर टीकेची झोड उठवली. ते भ्रष्टाचाऱ्यांचे म्होरके असल्याचा घणाघात केला. त्यानंतर लागलीच अजित पवार यांची दिल्लीवारी झाल्याने चर्चा रंगली आहे. विधानसभेत राष्ट्रवादीच्या पारड्यात किती जागा असतील याविषयीची चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाला अपेक्षित यश आले नाही. तर दुसरीकडे भाजपने विधानसभेसाठी जोरदार आघाडी उघडली आहे. शिंदे गट पण सक्रिय झाला आहे. त्यातच जागांचे त्रांगडे होऊ नये यासाठी तीनही पक्ष संवाद ठेवत आहेत. विधानसभेला अधिकाधिक जागा मिळाव्यात यावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.