आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून लोकसभा निवडणुकीसाठी 40 स्टार प्रकारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपा अध्यक्ष जे.पी नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह एकूण 40 नेत्यांचा स्टार प्रचारक म्हणून समावेश आहे. असं असलं तरी या यादीत शिवसेनेच्या लोकसभेतील प्रमुख नेत्याचंच नावं नाहीये. याच मुद्यावरून विरोधी पक्षनेता, शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी शिंदे गटावर टीकास्त्र सोडले. ‘ बाळासाहेबांना असल्या उसन्या भाटांची गरज पडली नाही, वैचारिक दिवाळखोरी आली की असले निर्णय घेतले जातात’अशी सडकून टीका दानवे यांनी शिंदे गटावर केली आहे. X या सोशल मीडिया साईटवरील अकाऊंटवरून दानवे यांनी एक ट्विट करत शिंदे गटावर हल्लाबोल चढवला आहे.
काय म्हटलं आहे दानवेंनी ट्विटमध्ये ?
वैचारिक दिवाळखोरी आली की असले निर्णय घेतले जातात. बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्याचे ढोंग करणाऱ्यांनी 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. या यादीत पहिल्या दहा मध्ये पाच नावे भाजप नेत्यांची आहेत. तर एकूण यादीत 25 टक्के प्रचारक हे परपक्षाचे आहेत.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे सोने कधीच कमी नव्हते आणि त्यांना असल्या उसन्या भाटांची गरज पडली नाही. ते विचार तुम्हाला कळले नाहीत, म्हणूनच या उसन्या प्रचारकांच्या, उसन्या विचारांच्या आणि भंपक योजनांच्या कुबड्या घ्याव्या लागत आहेत.
मोडेन पण वाकणार नाही, हा सुविचार महाराष्ट्राचा स्वभाव दर्शवतो.. यांचा कारभार उलटा आहे.. ‘वाकेन पण मोडणार नाही’! अशा शब्दात दानवेंनी शिंदे गटावर टीकास्त्र सोडले.
वैचारिक दिवाळखोरी आली की असले निर्णय घेतले जातात.
बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्याचे ढोंग करणाऱ्यांनी ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली.
या यादीत पहिल्या दहा मध्ये पाच नावे भाजप नेत्यांची आहेत. तर एकूण यादीत २५ टक्के प्रचारक हे परपक्षाचे आहेत. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख… pic.twitter.com/BX9ptSveU2— Ambadas Danve (@iambadasdanve) March 28, 2024
शिवसेनेच्या स्टार प्रचारक यादीत कोण कोण ?
या यादीमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर, पिपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष जोगेंद्र कवाडे, शिवसेना नेते रामदास कदम, शिवसेना नेते गजानन किर्तीकर, शिवसेना नेते आनंदराव अडसूळ, भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार मिलिंद देवरा, मंत्री गुलाबराव पाटील, शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे, शिवसेना नेत्या मीना कांबळी, खासदार श्रीकांत शिंदे, मंत्री उदय सामंत, मंत्री शंभुराज देसाई, मंत्री दिपक केसरकर, मंत्री अब्दुल सत्तार, मंत्री तानाजी सावंत, मंत्री संदीपान भुमरे, मंत्री दादाजी भुसे, मंत्री संजय राठोड, आमदार भारत गोगावले यांची नावे आहेत.