Sachin Waze: सहकारी वाझेंना म्हणायचे ‘टेक कॉप’; तयार केलं होतं स्वत:चं सर्च इंजिन आणि मोबाईल मेसेजिंग अ‍ॅप

| Updated on: Mar 28, 2021 | 10:02 AM

कधी कधी सचिन वाझे यांची चौकशी करताना NIAचे अधिकारीही गडबडून जातात. | Sachin Waze NIA

Sachin Waze: सहकारी वाझेंना म्हणायचे टेक कॉप; तयार केलं होतं स्वत:चं सर्च इंजिन आणि मोबाईल मेसेजिंग अ‍ॅप
सचिन वाझे
Follow us on

मुंबई: अंबानी स्फोटक प्रकरणात सध्या राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (NIA) ताब्यात असणाऱ्या API सचिन वाझे (Sachin Waze) यांच्याबाबत दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे. सचिन वाझे यांची कारकीर्द वादग्रस्त असली तरी ते मुंबई पोलीस दलातील तंत्रज्ञानाची उत्तम जाण असणाऱ्या मोजक्या अधिकाऱ्यांपैकी ते एक होते. या सचिन वाझे यांनी गुगलप्रमाणे स्वत:चं असं वेगळं सर्च इंजिन आणि एक अ‍ॅप्लिकेशनही तयार केले होते. (NIA bring tech savvy officers to probe Sachin Waze)

राष्ट्रीय तपास यंत्रणेतील (NIA) सूत्रांच्या माहितीनुसार, आतापर्यंत चौकशीत सचिन वाझे हे तंत्रज्ञानात अत्यंत पारंगत असल्याची बाब निदर्शनास आली आहे. त्यामुळेच सचिन वाझे यांना त्यांचे सहकारी टेक कॉप म्हणायचे. कधी कधी सचिन वाझे यांची चौकशी करताना NIAचे अधिकारीही गडबडून जातात. त्यामुळे आता NIAने चौकशी पथकात टेक्निकल एक्स्पर्टचाही समावेश केल्याची माहिती आहे.

सचिन वाझेंचं मोबाईल अ‍ॅप्लिकेशनही

सचिन वाझे यांनी व्हॉटसअ‍ॅपप्रमाणे स्वत:चं मोबाईल मेसेजिंग अ‍ॅप तयार केलं होतं. या अ‍ॅपचे नाव वाझे यांनी ‘डायरेक्ट बात’ (Direct Baat) असे ठेवले होते. वाझे यांच्या दाव्यानुसार हे जगातील सर्वात सुरक्षित मेसेजिंग अ‍ॅप आहे. देशातील सरकारी यंत्रणा, सरकारी अधिकारी, सेलिब्रिटी आणि उद्योगपतींना याचा फायदा होऊ शकतो, असे वाझे यांचे म्हणणे आहे.

ऑक्टोबर 2018 मध्ये सचिन वाझे यांनी हे अ‍ॅप लाँच केले होते. मात्र, आता हे अ‍ॅप गुगल प्ले स्टोअरवरुन हटवण्यात आले आहे. सध्या एनआयएच्या तंत्रज्ञांची टीम या अ‍ॅपच्या माध्यमातून झालेल्या संदेशवहनाची तपासणी करत आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून सचिन वाझे कोणाच्या संपर्कात होते, याचा शोध घेतला जात आहे.

सचिन वाझे यांचं सर्च इंजिन

मुंबई पोलीस दलात एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळख असलेल्या सचिन वाझे यांनी 2012 मध्ये एक सर्च इंजिनही तयार केले होते. या सर्च इंजिनचे नाव Indianpeopledirectory.com असे होते. या माध्यमातून गुगलप्रमाणे इंटरनेट सर्फिंग करता येते, असे वाझे यांचे म्हणणे आहे.

तसेच 2006 मध्ये सचिन वाझे यांनी मराठी भाषेतही एक अ‍ॅप तयार केले होते. या अ‍ॅपचे नाव ‘लय भारी’ असते होते. हा एकूण पसारा पाहता सचिन वाझे हे तंत्रज्ञानात अत्यंत कुशल असल्याची खात्री NIAच्या अधिकाऱ्यांना पटली आहे. त्यामुळे आता एनआयए यादृष्टीनेही वाझे यांची चौकशी करत आहे.

संबंधित बातम्या:

मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडल्याने टेन्शन वाढले, त्यानंतर वाझेंनी काय केलं?; वाचा, सविस्तर

मनसुख हिरेन-सचिन वाझेंची 17 फेब्रुवारीला भेट, CSMT भागातील सीसीटीव्ही फूटेज समोर

मनसुख हिरेन यांना अर्धमेल्या अवस्थेत खाडीत फेकले; एटीएसच्या हाती मोठा पुरावा

(NIA bring tech savvy officers to probe Sachin Waze)