महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी भाजप पक्षाचा जाहीरनामा आज प्रसिद्ध झाला. या प्रकाशन सोहळ्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी त्यांनी राज्यातील जनतेला संबोधित केलं. तसंच राहुल गांधींना सावरकरांबद्दल दोन शब्द चांगले बोलायला सांगा, असं खुलं आव्हान अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांना दिलं आहे. ज्या संकल्पपत्राचं लोकार्पण झालं ते महाराष्ट्रातील जनतेच्या आकांक्षेचं प्रतिबिंब आहे. महाराष्ट्र अनेक युगापासून देशाचं नेतृत्व केलं. भक्ती आंदोलनाची सुरुवात महाराष्ट्रात झाली. जेव्हा गरज पडली तेव्हा गुलामीतून मुक्तीचं आंदोलन शिवाजी महाराजांनी इथूनच सुरू केली. सामाजिक क्रांतीची सुरुवातही महाराष्ट्रातूनच झाली, असं अमित शाह म्हणाले.
तुम्ही तिसऱ्यांदा आम्हाला कौल द्या. तुम्ही आम्हाला पहिल्यांदा आम्हाला जनादेश दिला. नंतर २०१९मध्ये आम्हाला कौल दिला. पण काही लोकांनी सत्तेसाठी धोका दिला. पण ते जास्त काळ टिकू शकले नाही. आम्ही मोदींच्या नेतृत्वात लढत आहोत. आघाडीत अंतर्गत मतभेद आहेत. मी उद्धव ठाकरे यांना विचारतोय की, सावरकरांबद्दल राहुल गांधीना दोन शब्द चांगले बोलायला सांगाल का. काँग्रेसच्या नेत्यांना बाळासाहेब ठाकरेंबद्दल दोन शब्द बोलायला सांगाल का. मी उद्धव ठाकरेंना विनंती करतो हे जरा विचाराच…, असं खुलं आव्हान अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंना दिलं आहे.
शरद पवार यांच्यावरही अमित शाह यांनी जोरदार टीका केली आहे. शरद पवार यांना विचारतो दहा वर्ष तुम्ही केंद्रात मंत्री होता. २००४ ते २०१४ पर्यंत महाराष्ट्राच्या विकासासाठी काय केलं ते सांगा. तुमच्या सरकारमध्ये दहा वर्षात महाराष्ट्रावर किती अन्याय झाला ते सांगा. शरद पवार ज्या पद्धतीने आश्वासन देतात, ज्या पद्धतीने मुद्दे उपस्थित करतात त्याचा वास्तवाशी किलोमीटरपर्यंतही संबंध नसतो. खोटे आरोप करून नरेटिव्ह तयार करतात. नकली जनादेश घेण्याचं काम करतात. यावेळी ते होणार नाही. यावेळी महाराष्ट्राची जनता आमच्यासोबत आहे, असं अमित शाह म्हणालेत.
आम्ही शेतकऱ्यांचा सन्मान, गरीबांचं कल्याण करण्याचं म्हटलंय. आम्ही महिलांचा सन्मान करण्याचं आश्वासन दिलंय. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा जम्मूकाश्मीरमध्ये बाबासाहेबांच्या संविधानाची शपथ घेऊन मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली. याशिवाय वेगळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना काय श्रद्धांजली असू शकते. अराजकता फैलावणाऱ्यांना आम्ही दूर केली. आमच्या संकल्पपत्रता मजबूत महाराष्ट्र कसा होईल हे पाहिलं आहे. निवडणुकीत आमचा मुकाबला आघाडीशी आहे. त्यांना फक्त सत्ता हवी आहे. त्यांना विचारधारेशी घेणंदेणं नाही, असं म्हणत अमित शाह यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.