मुंबई : भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे कालपासून मुंबई दौऱ्यावर आले आहेत. काल त्यांनी भाजपच्या नेत्यांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी मुंबई महापालिकेसह राज्यातील महापालिका निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी अमित शाह यांनी मुंबई महापालिकेवर भाजपचाच महापौर बसला पाहिजे. त्यासाठी कामाला लागा. आतापासूनच वॉर्डावॉर्डात जा, असे आदेशच पक्ष नेत्यांना दिले आहेत. यावेळी महापालिका निवडणुका जिंकण्याचा सात कलमी कार्यक्रमही तयार करण्यात आला आहे. त्यामुळे ठाकरे गटाची डोकेदुखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अमित शाह हे काल संध्याकाळी मुंबईत आले. यावेळी त्यांनी भाजपच्या 13 जणांच्या कोअर कमिटीशी संवाद साधला. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. तसेच आशिष शेलार यांच्यासह इतर नेतेही या बैठकीला उपस्थित होते. तब्बल अडीच तास ही बैठक चालली. त्यानंतर आशिष शेलार यांनी मीडियाशी संवाद साधत बैठकीतील तपशील दिला. तब्बल अडीच तास ही बैठक चालली. महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अमित शाह यांनी आढावा घेतला. भाजपचं मुंबई संघटन, आगामी कार्यक्रम यावर बावनकुळे आणि फडणवीस यांनी मार्गदर्शन केलं, अशी माहिती शेलार यांनी दिली.
मुंबई महापालिकेत भाजपचा महापौर बसवा. भाजप, शिंदे गट आणि आरपीआय महायुतीचा महापौर महापालिकेत बसला पाहिजे. त्यासाठी कामाला लागा, असे आदेश अमित शाह यांनी दिला आहे. तसेच या बैठकीत आम्ही सात कलमी कार्यक्रम तयार केला आहे. महापालिका जिंकण्यासाठी हा कार्यक्रम उपयोगी पडणार आहे. तसेच प्रत्येक वॉर्ड, विभागाला डोळ्यासमोर ठेवून भाजप आक्रमकपणे प्रचार करेल. मुंबईकरांची सेवा करण्याची संधी भाजप आणि महायुतीला मिळेल. जनतेचा आशीर्वाद आमच्यासोबत राहील, अशी आशा शेलार यांनी व्यक्त केली.
उत्तर प्रदेशात गोळीबार करण्यात आला. त्यात गँगस्टर अतिक आणि अशरफ अहमद यांना ठार करण्यात आले. त्यावर शेलार यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. गुंड जर मेले असतील तर त्यावर हायतोबा करण्याची गरज नाही, असं शेलार म्हणाले.
दरम्यान, अमित शाह यांच्या हस्ते आज डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात येणार आहे. त्यासाठी खारघर येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या पुरस्कार सोहळ्याला सुमारे 20 लाख श्रीसेवक येणार असल्याचं सांगितलं जात आहे. कार्पोरेट पार्क मैदानावर हा सोहळा होत असून यासाठी आतापासूनच शेकडो श्रीसेवक आले आहेत.