‘मालवणमध्ये शिवरायांचा पुतळा कोसळणं हे दु:खद, मी हीच विनंती करु शकते की…’, अमृता फडणवीस यांची प्रतिक्रिया

| Updated on: Aug 28, 2024 | 6:33 PM

छत्रपती शिवाजी महाराज यांचा मालवणच्या राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला 35 फुट उंचीचा भव्य पूर्णाकृती पुतळा कोसळल्यामुळे शिवप्रेमींच्या भावना दुखवल्या आहेत. या घटनेवरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. या घटनेवर अमृता फडणवीस यांनीदेखील प्रतिक्रिया दिली आहे.

मालवणमध्ये शिवरायांचा पुतळा कोसळणं हे दु:खद, मी हीच विनंती करु शकते की..., अमृता फडणवीस यांची प्रतिक्रिया
अमृता फडणवीस
Follow us on

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे राजकोट किल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा कोसळ्याच्या घटनेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी तथा सामाजिक कार्यकर्त्या अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. “मी एवढंच म्हणेन की, ही घटना खूप दु:खद झाली. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनीदेखील स्पष्टीकरण दिलं आहे. हव्याच्या जोराने ते झालं आहे. कंत्राटदारांना धारेवर धरलं जाणार आहे की, असं झालंच कसं म्हणून. त्यापेक्षा मोठी गोष्ट अशी की, आपल्याला पुन्हा एक पुतळा तिथे उभारायला पाहिजे हीच मी विनंती करु शकते”, अशी प्रतिक्रिया अमृता फडणवीस यांनी दिली.

अमृता फडणवीस यांनी यावेळी महिला अत्याचाराच्या घटनांवरही प्रतिक्रिया दिली. “स्त्री म्हणून मला जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात अत्याचाराची घटना घडली की खूप त्रास होतो. त्याचा एक उपाय नाही, त्याचे खूप सारे उपाय मिळून एक उपाय बनतो. अशी घटना झाल्यानंतर त्वरित अॅक्शन आवश्यक आहे. तुम्हाला घरी शिकवलं गेलं की, स्त्रीचा आदर करावा. तर तुम्ही स्त्रीचा आदर करणार. पण काही माथेफिरु असतात की, त्यांच्या घरी तसं शिकवलं जात नाही. त्यांच्या कुटुंबात ते पाहतात की, स्त्रियांवर अत्याचार होत आहेत. तेच ते बाहेर जावून करतात. त्यामुळे कुटुंब हे महत्त्वाचं आहे. शाळा, कुटुंबातून स्त्रिला आदर करण्याचं शिकवणं खूप जरुरी आहे”, असं अमृता फडणवीस म्हणाल्या.

अमृता फडणवीस यांच्याकडून इकोफ्रेंडली गणेशमूर्ती बनवण्याचं आवाहन

“मला आज खूप आनंद आहे की, बच्चे बोले मोरया ही मोहीम सुरु केली आहे. त्यात स्वत: लहान मुलांनी शाडू माती आणि इतर पद्धतीने इको फ्रेंडली गणेशमूर्ती बनवल्या आहेत. त्याचबरोबर एक मनोरंजन कार्यक्रम आम्ही केला. ही लहान मुलं लोकांना समजवतील, आपल्याला संस्कृती पुढे न्यायची आहे, पण ते करता आपल्याला आपली जबाबदारी देखील पार पाडायची आहे. त्याचा हा छोटोसा प्रयत्न आहे”, असं अमृता फडणवीस यांनी सांगितलं.

“तुम्ही आमच्या काही फिल्म्सही पाहिल्या असतील. त्यामध्ये मी कचरा करणार नाही, अशी मोहीमही दाखवली आहे. आपण गाडीतून कचरा बाहेर टाकतो, प्लास्टिक वापरतो, कचऱ्याच्या पेटीत कचरा टाकला तर खूप समस्या कमी होतील”, असं अमृता फडणवीस म्हणाल्या. “आम्ही ऑनग्राउंड आहोतच आहोत. इकोफ्रेंडली गणेशमूर्ती वापरायची असं आम्ही आवाहन करतोय”, अशीदेखील प्रतिक्रिया त्यांनी दिली.