महायुतीचे बहुमताचे सरकार सत्तारूढ होत आहे. थोड्याच वेळात देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदाची सूत्र हाती घेत आहेत. त्यापूर्वी त्यांच्या घराची सूत्र ज्यांच्या हातात आहेत, त्या अमृता फडणवीस यांनी या ग्रँड शपथविधीपूर्वी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांचा संघर्ष अमृता फडणवीस यांनी जवळून पाहीला आहे. त्यांनी या सर्व घडामोडींवर आनंद व्यक्त करतानाच जबाबदारीचे त्यांना भान असल्याचे म्हटले आहे. मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यावर फडणवीस कोणता पहिला निर्णय घेतील असे त्यांना विचारले असता, अमृता फडणवीस यांनी एकदम चपखल प्रतिक्रिया दिली. काय आहेत त्यांच्या भावना?
खूप आनंदाचा क्षण
“देवेंद्र फडणवीस हे सहाव्यांदा आमदार झाले तर आता तिसऱ्यांदा ते मुख्यमंत्री पदी विराजमान होत आहे. ही माझ्यासाठी खूप आनंदाची बाब आहे. तितकीच जबाबदारीची पण गोष्ट आहे. मला खूप आनंद होत आहे की त्यांच्या मेहनतीला यश मिळाले आहे. महायुती एकत्रित आहे. आणि महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी त्यांना आजपासून वाटचाल सुरू केलेली आहे. आज मला खूप आनंद होत आहे. मी त्यांच्या संघर्ष जवळून पाहीला आहे. त्यांचे जीवनच एक संघर्ष आहे. पण त्यांच्यात जिद्द आहे. चिकाटी आहे. जेव्हा काही करायचं, तेव्हा ते करून दाखवतात. त्यांच्यात खूप संयम आहे”, अशा शब्दात अमृता फडणवीस यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.
लाडक्या बहिणींचे प्रेम
लाडकी बहीण योजनेने मोठी कमाल केल्याचे त्यांनी सांगितले. प्रचारा दरम्यान अनेक ठिकाणी जावे लागले. अनेक भागात आपण प्रचारासाठी गेलो. त्यावेळी लाडक्या बहिणींचे महायुती आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावरील प्रेम दिसले अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. त्यांनी नागपूर असो वा इतर ठिकाणी विकासाचे अनेक प्रकल्प राबवले. त्यामुळे लोकांनी विकासाला मत दिल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.
ते पुन्हा आले
मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन असे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. त्यावेळी त्यांची विरोधकांनी हेटाळणी केली. त्यांच्या विधानाची टर उडवण्यात आली. यावर सुद्धा अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांच्यावर टीका झाली. टिप्पणी झाली. पण त्यांचे अर्जुनासारखं एकच लक्ष्य होतं. त्यांनी जनतेच्या विश्वासाचं कामातून चीज करून दाखवलं. त्यांना गादीसाठी पुन्हा यायचं नव्हतं. तर लोकांच्या सेवेसाठी पुन्हा यायचं होतं, असे मत अमृता फडणवीस यांनी मांडलं.
देवाभाऊंचा पहिला निर्णय कोणता?
राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचा पहिला निर्णय कोणता असेल? या प्रश्नावर त्यांनी चपखल उत्तर दिलं. लोकहिताचा पहिला निर्णय असेल असे झटपट उत्तर अमृता फडणवीस यांनी दिले. त्यांच्याविरोधात नॅरेटिव्ह केले तरी जनतेने त्यांच्यावर विश्वास दाखवला. त्यांच्या पाठीशी जनता उभी राहिली याचा खूप आनंद असल्याचे त्या म्हणाल्या.