गणपती बाप्पा मोरया…. अनंत अंबानींकडून लालबागच्या राजाला 20 किलोंचा सोन्याचा मुकूट, किंमत जाणून घ्या

| Updated on: Sep 06, 2024 | 10:51 PM

लालबागच्या राजाला रिलायन्स समुहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांचे धाकटे चिरंजीव अनंत अंबानी यांची मंडळामध्ये मानद सदस्य म्हणून नियुक्ती झाली. अनंत अंबानींनी आपल्या कुटुंबियांकडून लालबागच्या राजाला 20 किलो सोन्याचा मुकूट अर्पण केला आहे.

गणपती बाप्पा मोरया.... अनंत अंबानींकडून लालबागच्या राजाला 20 किलोंचा सोन्याचा मुकूट, किंमत जाणून घ्या
Follow us on

मुंबईतील प्रसिद्ध गणपती लालबागच्या राजाची पहिली झलक सर्वांना पाहायला मिळाली. नवसाला पावणारा अशी ख्याती असलेल्या लालबागच्या राजा मंडळाचे हे 91 वे वर्ष आहे. लालबाग राजाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी देश-विदेशातील सर्व क्षेत्रातील दिग्गज उपस्थिती लावतात. यंदाचा लालबागचा राजा मयूरासनावर विराजमान आहे. लालबागच्या राजाला रिलायन्स समुहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांचे धाकटे चिरंजीव अनंत अंबानी यांची मंडळामध्ये मानद सदस्य म्हणून नियुक्ती झाली. अनंत अंबानींनी आपल्या कुटुंबियांकडून लालबागच्या राजाला 20 किलो सोन्याचा मुकूट अर्पण केला आहे. या मुकुटाची जोरदारा चर्चा होत असलेली पाहायला मिळत आहे.

लालबागच्या राजाची मनमोहक अशी 14 फुटांची बाप्पाची मूर्ती यंदाच्या वर्षी मयूरासनावर विराजमान आहे. लालबागच्या राजाला यंदा मयूर महल केला असून मंडळाचे हे 91 वे वर्ष आहे. विशेष म्हणजे लालबागच्या राजावर यावर्षी 20 किलो सोन्याचा मुकुट पाहायला मिळतोय. ज्याची किंमत तब्बल 16 कोटी रुपये आहे, त्यामुळे बाप्पांच्या मूर्तीमध्ये अधिकच सुंदरता दिसून येते.

मुंबईतील सुप्रसिद्ध लालबागचा राजा मंडळाच्या कार्यकारणीमध्ये उद्योजक अनंत अंबानी यांची कार्यकारी सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. मंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत यासंदर्भातील ठराव मंजूर करण्यात आला आहे. यामुळे आता अनंत अंबानी देखील लालबागच्या राजाच्या मंडळाचाच एक महत्वाचा भाग बनले आहेत.

अनंत अंबानी गेल्या 15 वर्षांपासून लालबागच्या राजाच्या मंडळाशी विविध उपक्रमांच्या माध्यमातून जोडले गेलेले आहेत. रिलायन्स फाऊंडेशनच्या माध्यमातून लालबागच्या राजाच्या मंडळाला विविध आरोग्य विषयक उपक्रमांसाठीही अंबानी कुटुंबीयांच्या वतीनं मदत केली गेली आहे.

दरम्यान, शनिवारी गणेश चतुर्थीच्या दिवशी पहाटे 4 वाजता राजाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. 6 वाजता दर्शन भाविकांसाठी खुले होणार आहे. अनंत अंबानी यांनी 20 किलो सोन्याचा आणि 16 कोटी रुपये किमतीचा मुकुट दिल्याची माहिती लालबाग राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ अध्यक्ष बाळासाहेब कांबळे यांनी दिली.