अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाची देशभरात चर्चा होत आहे. कोणत्याही राजाच्या शाही विवाहासारखाच हा विवाह सोहळा मुंबईच्या बीकेसी येथील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये होत आहे. या लग्नात आधुनिकतेची झलक दिसत आहे. मात्र, जुन्या परंपरांही जपल्या जात आहेत. त्यामुळेच अनंत आणि राधिका यांच्या लग्नात पाहुण्यांना मुंबईतूनच बनारसचा घाट दिसणार आहे. अनंत राधिकाच्या लग्नात भारतीय संस्कृती, सभ्यता, अध्यात्म, भारतीय लोककला, कारागिरी, संगीत, पदार्थ यासह अनेक खास गोष्टी दिसणार आहेत.
अनंत आणि राधिका यांच्या लग्नाची सजावट ‘ॲन ओड टू वाराणसी’ या थीमवर आधारित आहे. वाराणसी या प्राचीन शहराची परंपरा, धार्मिकता, संस्कृती, कला, हस्तकला आणि बनारसी खाद्यपदार्थ यांचे दर्शन लग्नात होत आहे. बनारसी चाट, परफ्यूम – बांगड्यांचे दुकान, कठपुतळी शोसह पाहुण्यांचे स्वागत करण्यात येत आहे. येथे पाहुण्यांसाठी बनारसी जेवणाचाही बेत आखला आहे.
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या मुलाच्या लग्नठिकाणी पोहोचल्यावर पाहुण्यांना बनारसची परंपरा आणि अध्यात्माशी जोडण्याची संधी मिळेल. याशिवाय त्या शहरातील खाद्यपदार्थांचा आस्वादही घेता येणार आहे. समारंभात अनेक स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. प्रत्येक पाहुण्यांच्या भोजनाची संपूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे. लग्नाला येणारे पाहुणे या संपूर्ण कार्यक्रमाचा आनंद घेतील. शिवाय जाताना बनारसच्या घाटांच्या आठवणीही सोबत घेऊन जाणार आहेत.
अनंत राधिकाच्या लग्नाला येणाऱ्या पाहुण्यांना बनारसी चाट, मिठाई, लस्सी, चहा, खारी, स्ट्रीट फूड असे पदार्थ खाण्याचा पर्याय असेल. याशिवाय प्रसिद्ध बनारसी पानानेही लोकांचे तोंड गोड करण्यात येणार आहे. बाबा विश्वनाथ यांच्या शहरातील प्रसिद्ध पितळेचे काम, मातीची भांडी बनवण्याची कला, बनारसी आणि कांजिवरण साड्या तयार करण्याची पद्धत पाहुण्यांना पाहता येणार आहे. शीशम फर्निचरसारख्या पारंपरिक कलाही पाहुण्यांना पाहता येणार आहे.
याशिवाय पाहुण्यांची इच्छा असल्यास ते ज्योतिष स्टॉललाही भेट देऊ शकतात. जिथे ते त्यांचे भविष्य जाणून घेऊ शकतात. परफ्यूम स्टॉलला भेट देऊन अप्रतिम सुगंधाचा आनंद घेऊ शकतात. बांगड्या विक्रीच्या स्टॉलला भेट देऊन रंगीत बांगड्या खरेदी करण्याचा पर्यायही देण्यात आला आहे. लग्नाच्या ठिकाणी पाहुण्यांसाठी कठपुतळीचा कार्यक्रमही सादर केला जाणार आहे. मजेदार चित्रे क्लिक करण्यासाठी फोटो स्टुडिओदेखील उपलब्ध आहे.