अंधेरीत इमारतीला भीषण आग, चार तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश

| Updated on: Feb 13, 2020 | 4:06 PM

अंधेरी पूर्व एमआयडीसी परिसरातील रोल्टा टेक्नॉलॉजीज या आयटी कंपनीला भीषण आग लागली. तब्बल चार तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश.

अंधेरीत इमारतीला भीषण आग, चार तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश
Follow us on

मुंबई : अंधेरी पूर्व एमआयडीसी परिसरातील रोल्टा टेक्नॉलॉजीज या आयटी कंपनीला भीषण आग लागली. कंपनीच्या दुसऱ्य़ा मजल्यावरील सर्व्हर रुमला आग लागल्याची माहिती आहे (Andheri Rolta Company Fire). आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 24 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. तब्बल चार तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे. ही आग लेव्हल-4 ची असल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली आहे (Andheri Rolta Company Fire).

 

रोल्टा टेक्नॉलॉजीजच्या दुसऱ्या मजल्यावरील सर्व्हर रुमला ही भीषण आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे गुरुवारी सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास ही आग लागल्याची माहिती आहे. मात्र, काही काळाने या आगीने रौद्ररुप धारण केले होते. दुसऱ्या मजल्यावरुन वरच्या मजल्यापर्यंत ही आग पसरली होती. आग इतकी भीषण होती की धुराचे मोठ-मोठाले लोळ हवेत उठत होते.

चार तासांपासून या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु होते. अखेर साडे तीन वाजताच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. दुपारी एकच्या सुमारास या आगीवर नियंत्रण येईल असं वाटत होतं. मात्र, नंतर ही आग आणखी भडकली. खबरदारी म्हणून परिसरातील इतर इमारती रिकाम्या करण्यात आल्या. परिसरातील इतर कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांना श्वसनाचा त्रास झाल्याने त्यांना रुग्णालयात हलवण्यात आलं.

नेमकं काय घडलं?

अंधेरी पूर्व एमआयडीसी परिसरात रोल्टा टेक्नॉलॉजीज ही आयटी कंपनी आहे. शॉर्ट सर्किटमुळे गुरुवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास या कंपनीच्या दुसऱ्या मजल्यावरील सर्व्हर रुमला आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं. अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. दुपारी एकच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळेल असं वाटलं. मात्र, ही आग आणखी भडकली, दुसऱ्या मजल्यावरुन ती वरच्या मजल्यापर्यंत पोहोचली. वरच्या मजल्यावरील ट्रान्सफॉर्मर्समुळे आग आखणी वाढली. त्यामुळे अग्निशमन दलाच्या आणखी गाड्या मागवण्यात आल्या.

अग्निशमन दलाच्या जवानांनी 70 मीटर उंच शिडीच्या सहाय्याने वरच्या मजल्यावर पोहोचले, इमारतीच्या काचा फोडून आग विझवण्याचा प्रयत्न केला. अखेर अग्निशमन दलाच्या जवानांच्या प्रयत्नांना यश आलं आणि आग आटोक्यात आली.

गेल्या दोन वर्षांपासून ही कंपनी बंद असल्याने आग लागली तेव्हा कंपनीत कुणीही नव्हतं. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र, कंपनी बंद असताना कंपनीला आग लागली कशी, असा प्रश्न परिसरातील नागरिकांनी उपस्थित केला.