गजानन उमाटे, नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नंबर दोनचे नेते अजित पवार भाजपसोबत हातमिळवणी करणार असल्याच्या बातम्या केवळ चर्चा आहे की पडद्यामागे खरच काहीतरी घडतंय. चित्र काही दिवसात स्पष्ट होईल. पण सध्यातरी राजकीय स्थिती काहीशी डळमळीत झाल्याचं दिसून येतंय. अजित पवार यांनी काल पुण्यातील सर्व कार्यक्रम एकाएकी रद्द केले. अजितदादांचा आजचा मुक्काम मुंबईत, विधानभवनात असेल, असं सांगण्यात आलंय. तर राज्यभरातील राष्ट्रवादीचे आमदारही मुंबईच्या दिशेने निघाल्याच्या चर्चा आहेत. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख हेदेखील मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. टीव्ही9शी बोलताना त्यांनी यास दुजोरा दिला. मात्र अजित पवारांच्या बंडखोरीबाबत त्यांनी प्रतिक्रिया देणं टाळलं.
अनिल देशमुख एकाएकी मुंबईच्या दौऱ्यावर निघाले आहेत. तिथे नेमकं काय काम आहे, याबाबत त्यांनी फार खुलासा केला नाही. अनिल देशमुख म्हणाले, ‘ मी मंत्रालयातील काही कामासाठी मुंबई दौऱ्यावर निघालो आहे. विधानभवनात अजित पवार यांची भेट होऊ शकते. २३ तारखेला शरद पवार अमरावती दौऱ्यावर आहेत. त्या कार्यक्रमाचं नियोजन असे चर्चेचे विषय असतील. शरद पवारदेखील मुंबईत असतील तर त्यांचीही भेट घेऊ शकतो. पण अजित पवार भाजपात जाणार असल्याच्या केवळ वावड्या आहेत. अजित पवार कुठेही जाणार नाहीत. त्यामुळे माझी याबाबत भूमिकाही स्पष्ट करण्याची गरज वाटत नाही….
महाराष्ट्राच्या राजकारणात लवकरच भूकंप होण्याची शक्यता आहे. अजित पवार कोणत्याही क्षणी आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र राज्यपालांना देण्याची शक्यता आहे. द इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्रातील एका बातमीतून हा दावा करण्यात आलाय. ५३ पैकी ४० राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी अजित पवार यांच्यासोबत असल्याच्या पत्रावर स्वाक्षऱ्या केल्याचा दावा या बातमीतून करण्यात आला आहे. फक्त नेमकी वेळ पाहून राज्यपालांना यासंदर्भातील पत्र देण्यात येईल, असं सांगण्यात येतंय.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आणि अमरावतीचे अपक्ष आमदार रवी राणा यांनी या राजकीय भूकंपाची नेमकी वेळ काय असेल यासंदर्भातील सूतोवाच काल केले. नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी हिरवा कंदील दाखवताच, राज्यात हा स्फोट होऊ शकतो, असं राणांनी म्हटलं. तर सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाआधीच अजित पवार यांच्या नेतृत्वात सरकार बनलं तर सत्तेतील भाजपच्या वर्चस्वालाही धक्का लागणार नाही, अशी शक्यताही वर्तवली जात आहे.