नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट अजित पवार यांच्या नेतृत्वात राज्य सरकारमध्ये सहभागी झाला. बहुसंख्य आमदार आमच्या बाजूने असल्याचं अजित पवार यांचं म्हणणं आहे. प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या या गटाचे कार्यकारी अध्यक्ष आहेत. अजित पवार यांनी आपल्यासोबत कोण येऊ शकते, याची चाचपणी केली. बहुसंख्य आमदार आपल्या सोबत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी शिंदे-भाजप गटात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी त्यांनी बऱ्याच आमदारांना फोन केले होते.
अनिल देशमुख यांना अजित पवार गटाकडून मंत्रीपदाची ऑफर होती. प्रफुल्ल पटेल यांनी अनिल देशमुख यांना संपर्कसुद्धा साधला होता. शपथविधीच्या दिवशी प्रफुल्ल पटेल यांनी अनिल देशमुख यांना दोन वेळा फोन केला होता, अशी माहिती समोर आली आहे.
जे कोणी आमदार राष्ट्रवादी काँग्रेसमधून अजित पवार यांच्यासोबत गेलेत, त्यांना ऑफर देण्यात आली होती. मलासुद्धा ऑफर देण्यात आली होती. कारण जास्तीतजास्त आमदार त्यांच्यासोबत यायला हवेत, असा खुलासा माजी मंत्री अनिल देशमुख यांनी केला.
परंतु, काही आमदार अजित पवार गटात गेले, काही आमदार गेले नाहीत. आम्ही निर्णय घेतला होता की, शेवटपर्यंत शरद पवार यांच्यासोबत राहणार. ज्या दिवशी शपथविधी होता त्या दिवशी संपर्क साधला गेला. शपथविधीच्या एका दिवशीसुद्धा संपर्क केला होता. त्यावेळी असं सांगितलं नव्हतं की शपथविधी आहे म्हणून.
तुम्ही लवकरात लवकर मुंबईला पोहचा, असा निरोप आला होता, अशी माहिती अनिल देशमुख यांनी दिली. अनिल देशमुख यांच्या खुलाशानंतर प्रफुल्ल पटेल आणि अजित पवार या दोघांनी मिळून सर्व जुळवाजुळव केली असल्याची माहिती समोर आली आहे.