मुंबई : आजचा दिवस राज्याच्या राजकारणात खळबळ माजवतच उगवला. कारण ईडीने सकाळीच मंत्री अनिल परब यांच्या घरी आणि इतर मालमत्तावर धाडसत्र सुरू केलं. यादरम्याने ईडीकडून अनिल परब यांच्या निकटवर्तीयांचीही चौकशी करण्यात आलीय. यात अनिल परब यांचे निकटवर्तीय संजय कदम यांच्याही घरावर दिवसभर छापेमारी झालीय. तसेच त्यांची दिवसभर ईडीकडून चौकशीही झाली आहे. या चौकशीनंतर अनिल परब आणि संजय कदम यांनी भाजपवर आणि केंद्रीय तपास यंत्रणांवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. हे सर्व भाजपकडून मुंबई महापालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून दबाव आणण्यासाठी सुरू आहे, असा थेट आरोप त्यांच्याकडून करण्यात आला आहे. ईडी दिवसभर फक्त पुन्हा पुन्हा अनिल परब यांच्याबाबतच विचारत होती, असेही संजय कदम म्हणाले आहेत.
मंत्री अनिल परब यांचे निकटवर्तीय शिवसेना नेते संजय कदम यांच्या घरावर सुमारे 12 तास चाललेल्या ईडीच्या कारवाईनंतर ईडीचे पथक बाहेर आले. त्यानंतर संजय कदम म्हणाले की, आम्ही ईडीच्या अधिकाऱ्यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहेत, ईडी पुन्हा पुन्हा फक्त मंत्री अनिल परब यांच्याबाबत विचारत होती. आधी इनकम टॅक्स मग ईडीची कारवाई ही जाणीवपूर्वक आमच्यावर केली जात आहे. पण येत्या बीएमसी निवडणुकीत जनता भाजपला त्याचे उत्तर देईल. असा इशारा त्यांनी दला आहे. तसेच ईडीने त्यांना नोटीस दिली असून सोमवारी पुन्हा चौकशीसाठी ईडी कार्यालयात बोलावले आहे, अशी माहितीही त्यांनी दिली आहे.
आज ईडीच्या अधिकाऱ्यांनी माझ्या घरावर आणि माझ्याशी संबंधित लोकांवर छापेमारी केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासू आशा बातम्या समोर येत होत्या. यामागचा गुन्हा तपासल्यावर हे लक्षात आलं की दापोली येथील साई रिसॉर्ट, याचे मालक दुसरेच आहेत. त्यांनी त्यांची मालकी सांगितली आहे. त्यांनी खर्चाचाही हिशोब दिला आहे. मात्र तरीही काही दिवसांपूर्वी इनकम टॅक्सची रेड झाली आहे. हे रिसॉर्ट अजूनही सुरू झालं नाही. तरी सांडपाणी समुद्रात जातं असा गुन्हा केंद्रीय पर्यावरण खात्यानं दाखल केला. याबाबात सर्वांनी रिपोर्ट बंद असल्याचे रिपोर्ट दिले आहेत, तरीही माझ्यावर तक्रार दाखल केली आणि आज माझ्यावर छापे मारले, असा आरोप यावेळी परबांनीही केला आहे.
तसेच विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं मी दिली आहेत. मी उत्तरं द्याला बांधिल आहे. आधीही उत्तरं दिली होती, आजही दिली आहेत. याच्यापुढेही प्रश्न विचारले तरी उत्तरं देण्याची माझी तयारी आहे. मात्र समुद्रात सांडपाणी जात असेल तर त्याच पैशाचा हिशोब आला कुठून? हे सर्व कोर्टात स्पष्ट होईल. मला सर्व कायदा महिती आहे. कायद्याने काय होईल ते बघू. तसेच विरोधकांनी केले दावे खोटे आहेत, या पेरलेल्या बातम्या आहेत, असेही परब म्हणाले.