चंद्रकांत पाटील म्हणतात ‘सामना’तून माझ्यावर गलिच्छ टीका; शिवसेनेनं दिलं प्रत्युत्तर

| Updated on: Jan 01, 2021 | 2:26 PM

सामना ब्रँड आहे आणि ती ठाकरे शैली आहे. त्या ब्रँडला साजेशी भाषाच लिहिली जाते. | Anil Parab

चंद्रकांत पाटील म्हणतात सामनातून माझ्यावर गलिच्छ टीका; शिवसेनेनं दिलं प्रत्युत्तर
अनिल परब, परिवहन मंत्री
Follow us on

मुंबई: भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी ‘सामना’तून आपल्यावर गलिच्छ भाषेत टीका होत असल्याविषयी थेट रश्मी ठाकरे यांच्याकडे तक्रार करण्याचा इशारा दिल्यानंतर आता शिवसेनेकडून (Shivsena) त्यांना प्रत्युत्तर देण्यात आले आहे. ‘सामना’मधून गलिच्छ टीका झाली, असे म्हणणे योग्य नाही. ‘सामना’त ठाकरी शैलीचा वापर केला जातो. तोच ‘सामना’चा ब्रँड आहे. त्या ब्रँडला साजेशी भाषा ‘सामना’त लिहिली जाते, असे शिवसेना नेते अनिल परब यांनी सांगितले. (Anil Parab hits back Chandrakant Patil)

ते शुक्रवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्या आरोपांचे खंडन केले. ‘सामना’मधून मला वाटत नाही कोणती गलिच्छ टीका होते. ‘सामना’ची विशिष्ट शैली आहे, सामना ब्रँड आहे आणि ती ठाकरे शैली आहे. त्या ब्रँडला साजेशी भाषाच लिहिली जाते. ती भाषा गलिच्छ नसते, असे परब यांनी म्हटले.

नेमकं काय घडलं?

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत (Varsha Sanjay Raut) यांना आलेल्या ईडी नोटिसीविषयी ‘सामना’त अग्रलेख लिहण्यात आला होता. ‘डोक्यात सडकी हवा आणि पार्श्वभागात घुसलेला बाण, हेच तुमचे भविष्य’ अशा शब्दात चंद्रकांत पाटलांवर ‘सामना’तून बोचरी टीका करण्यात आली होती. ही भाषा अशोभनीय असल्याची तक्रार ‘सामना’च्या संपादक रश्मी ठाकरे यांच्याकडे करणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होते.

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘दैनिक सामना’मध्ये माझ्याविरोधात गलिच्छ भाषेत लिखाण केले. संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीची नोटीस होती, त्यावेळी त्यांची भाषा शोभनीय नव्हती. मिसेस मुख्यमंत्री रश्मी ठाकरे सामनाच्या संपादक आहेत. संपादक म्हणून ही त्यांची भाषा असू शकत नाही, मग अग्रलेखात ती कशी? त्यामुळे त्यांना मी पत्र लिहिणार असल्याचे पाटील यांनी सांगितले होते.

भाजपच्या नेत्यांना अनिल परबांचा खोचक टोला

अनिल परब यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना भाजपच्या बड्या नेत्यांना टोला लगावला. भाजपच्या दिल्लीतील नेत्यांनी फक्त महापालिका निवडणूकच कशाला आमच्याकडे चाळ कमिटीच्या निवडणुका लागणार आहेत , त्यातही त्यांनी उतरावं, असे परब यांनी म्हटले.

संबंंधित बातम्या:

माझ्याविरुद्ध गलिच्छ भाषेत लिखाण, चंद्रकांतदादा थेट रश्मी ठाकरेंना पत्र लिहिणार

डोक्यात सडकी हवा आणि पार्श्वभागात घुसलेला बाण, हेच तुमचे भविष्य; सामनाच्या अग्रलेखातून राऊत बरसले

(Anil Parab hits back Chandrakant Patil)