मुंबई: एसटी संपावर तोडगा काढण्यासाठी परिवहन मंत्री अनिल परब यांनी आज थेट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा सागर बंगला गाठला. यावेळी त्यांनी फडणवीसांसोबत एसटी कामगारांच्या संपावर चर्चा केली. कोर्टाचे आदेश आणि एसटीची आर्थिक स्थिती यावरही या बैठकीत चर्चा झाली. यावेळी अनिल परब यांनी चर्चेच्या तोडग्याचा फॉर्म्युला देण्याचं ठरल्याचं सांगितलं जातं. पगाराचा मुद्दा कसा सोडवायचा याबाबतच्या काही सूचना फडणवीस यांनी परब यांना दिल्या असून ही बैठक सकारात्मक झाल्याचं सूत्रांनी सांगितलं.
भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी आज एसटी कामगारांच्या शिष्टमंडळासह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर अनिल परब यांनी सागर बंगल्यावर जाऊन फडणवीस यांची भेट घेतली. नंतर परब यांनी मीडियाशी संवाद साधला. एसटी कर्मचाऱ्यांशी आजही चर्चा करण्यासाठी आम्ही तयार आहोत. फडणवीसांनीही या अनुषंगाने काही सूचना केल्या आहेत. त्या सूचनांचा आम्ही जरूर विचार करू. चर्चा सकारात्मक करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, असं परब म्हणाले.
फडणवीस माजी मुख्यमंत्री होते. त्यांनीही राज्याचा कारभार केला आहे. त्यांनी काही सूचना केल्या आहेत. त्यावर आम्ही विचार करणार आहोत. याबाबतीत सर्व विचार करून शासनाचं मत घेऊन आम्ही त्यावर निर्णय घेऊ, असं सांगतानाच एसटी कामगारांबाबत सरकारची नकारात्मक भूमिका नाही. आमची सकारात्मकच भूमिका राहिली आहे. काही प्रश्न कोर्टाच्या समितीसमोर आहेत. तर जे सरकारच्या आधीन आहेत ते प्रश्न सोडवले आहेत, असं ते म्हणाले.
तिढा अजून सुटला नाही. मी सकाळी आवाहन केलं आहे. त्यांचा विलगीकरणाचा मुद्दा हायकोर्टाच्या समितीपुढे आहे. बाकी त्यांच्या सर्व मागण्या मान्य झाल्या आहेत. त्यांच्याशी केव्हाही कधीही चर्चा करायला तयार आहोत. त्यांनी प्रश्न समजून घ्यावा, असं आवाहन त्यांनी केलं.
दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली. देवेंद्र फडणवीस यांच्याशी आमची एसटीबाबत सखोल चर्चा झाली. प्रवाशी कर घेणं बंद केलं तर 700 ते 800 कोटी वाचणार आहेत. त्यावरही चर्चा झाली. काहीना काही समाधानकारक तोडगा देऊन हा संप मिटवावा अशी चर्चा झाली, असं पाटील म्हणाले.
दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी प्रवाशी कर घेऊ नये अशी मागणी केली आहे. त्यामुळे एसटीचे 700 ते 800 कोटी रुपये वाचणार आहेत. हा पैसा एसटी कामगारांच्या पगारासाठी वापरता येऊ शकतो. त्यानुषंगाने आता राज्य सरकार विचार करण्याची शक्यता आहे. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रुग्णालयातून आल्यावरच या सर्व गोष्टी शक्य होणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे कामगारांच्या पगाराचा तिढा सुटतो का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 18 November 2021 pic.twitter.com/agMSejUIpw
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 18, 2021
संबंधित बातम्या: