मुंबई/नवी दिल्ली : बहुमत चाचणीला (Maharashtra floor test) सुप्रीम कोर्टाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे उद्या महाविकास आघाडी सरकारला बहुमत चाचणीला सामोरे जावे लागणार आहे. तर सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुरुंगात असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) आणि मंत्री नवाब मलिक यांना या बहुमत चाचणीत सहभागी होण्याला मंजुरी देण्यात आली आहे. उद्या बहुमत चाचणी आहे. त्यात आघाडीच्या त्या चार मतांचे काय होणार, हा प्रश्न निर्माण झाला होता. या चार मतांमध्ये दोघांना कोरोना, तर दोघे तुरुंगात आहेत. त्यातील दोन आमदारांना मतदान करण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. तर तिकडे भाजपाचा (Maharashtra BJP) आत्मविश्वास वाढलेला दिसून येत आहे. उद्याची बहुमत चाचणी पुढे ढकलण्यासाठी शिवसेनेने याचिका दाखल केली होती. मात्र त्यात शिवसेनेला यश आले नाही.
नुकत्याच झालेल्या राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीच्या वेळी नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांनी मतदान करण्याची परवानगी मागितली होती. मात्र कोर्टाने तेव्हा त्यांना परवानगी दिली नव्हती. आता मविआच्या बहुमत चाचणीदरम्यान मलिक आणि देशमुखांना मत देण्याची संधी मिळाली आहे. यासंबंधी कोर्टात मागणी करण्यात आली होती. त्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद न्यायालयाने दिला आहे. मात्र ही परवानगी मिळालेली असली तरी बहुमताचा आकडा गाठणे महाविकास आघाडीसाठी अवघड असल्याचे दिसत आहे.
नवाब मलिक आणि अनिल देशमुख हे दोघेही मनी लाँडरिंग प्रकरणाशी संबंधित असल्याच्या आरोपाखाली अटकेत आहे. अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीकडून त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली. सध्या ते तुरुंगात आहेत. इकडे शिवसेनेतून 39 आमदार फुटल्यामुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात असल्याचे सध्यातरी दिसत आहे. उद्या महाविकास आघाडी सरकारला बहुमत चाचणी सिद्ध करायची आहे. त्यामुळे सरकारला एक-एक मत अत्यंत महत्त्वाचे आहे. तर शिंदे गटाने शिवसेनेच्या 39 आमदारांसह अपक्षांची साथ असल्याचे म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांनी आपल्या पदाचा त्याग केला आहे. आता केवळ औपचारिकता राहिली असल्याचे बोलले जात आहे.