ठाकरे सरकारने उचलबांगडी केलेल्या अश्विनी भिडे यांची पुन्हा मेट्रोत वर्णी; शिंदे-फडणवीस सरकारचा शिवसेनेला झटका

| Updated on: Jul 12, 2022 | 6:42 PM

तत्कालीन ठाकरे सरकारने अश्विनी भिडे यांची मेट्रो 3 प्रकल्पाच्या संचालक पदावरुन उचलबांगडी करत मुंबई महापालिकेचं अतिरिक्त आयुक्तपदी त्यांची नियुक्ती केली होती. मात्र, महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi Government) कोसळताच सत्तेत आलेल्या नव्या शिंदे-फडणवीस सरकारने अश्विनी भिडे यांच्यावर मेट्रो 3 च्या संचालक पदाची जबाबदारी दिली आहे.

ठाकरे सरकारने उचलबांगडी केलेल्या अश्विनी भिडे यांची पुन्हा मेट्रोत वर्णी; शिंदे-फडणवीस सरकारचा शिवसेनेला झटका
Follow us on

मुंबई : मुंबई मेट्रो 3 प्रकल्पाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी आयएएस अधिकारी अश्विनी भिडे (Ashwini Bhide) यांची पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाने पत्राद्वारे त्यांच्या नियुक्तीचे आदेश काढले आहेत. तसेच तातडीने पदभार स्वीकारावा असेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे. तत्कालीन ठाकरे सरकारने अश्विनी भिडे यांची मेट्रो 3 प्रकल्पाच्या संचालक पदावरुन उचलबांगडी करत मुंबई महापालिकेचं अतिरिक्त आयुक्तपदी त्यांची नियुक्ती केली होती. मात्र, महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi Government) कोसळताच सत्तेत आलेल्या नव्या शिंदे-फडणवीस सरकारने अश्विनी भिडे यांच्यावर मेट्रो 3 च्या संचालक पदाची जबाबदारी दिली आहे. शिंदे-फडणवीस सरकारने तडकाफडकी हा निर्णय घेत शिवसेनेला झटका दिला आहे.

राज्यात आलेल्या नवीन सरकारनं मुंबईचं फुफ्फुस म्हणून ओळख असलेल्या आरे जंगलातच मेट्रो कारशेड बांधण्याचा निर्णय घेतला. उद्धव ठाकरे सरकार येताच हा प्रकल्प आरेमधून हलवून कांजूरमार्ग येथे उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण मध्यवधित आलेल्या नव्या शिंदे सरकारने पुन्हा एकदा कांजूरमधील प्रकल्पाला स्थगिती देत आरेतच कारशेड उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातच आता नव्या शिंदे-फडणवीस सरकारने अश्विनी भिडे यांच्यावर मेट्रो 3 च्या संचालक पदाची जबाबदारी सोपवत थेट शिवसेवर कुरघोडी केली आहे.

मेट्रोच्या कारशेडच्या जागेवरुन मोठा वाद उफाळला होता. मुंबईच्या आरे कॉलनीत मेट्रो कारशेड तयार करण्याचा निर्णय तत्कालीन फडणवीस सरकारने घेतला होता. पण या निर्णयाला पर्यावरण प्रेमींचा विरोध होता. विशेष म्हणजे शिवसेनादेखील फडणवीसांच्या विरोधात उभी राहिली होती. तरीही देवेंद्र फडणवीस मेट्रोचं कारशेड आरेमध्येच करण्यासाठी आग्रही होते.

अश्विनी भिडे या सुरुवातीपासून मेट्रो 3चं काम पाहत होत्या. या प्रकल्पात येणाऱ्या अडथळ्यांची त्यांना चांगलीच कल्पना आहे. जमीन अधिग्रहन, तसेच अनेक सोसायट्यांची जमीन घेण्यासाठी प्रयत्न, याशिवाय आरे कारशेडला झालेला प्रचंड विरोध या सगळ्या घडामोडींदरम्यान भिडे यांनी महत्त्वाचे निर्णय घेतले होते. त्यांनी विरोधकांचा विरोध दडपून काढण्यासाठीदेखील प्रयत्न केले होते. त्यामुळे मेट्रोचं काम पुन्हा गतीने होण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने पुन्हा एकदा त्यांच्यावर मेट्रो प्रकल्पाच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपवली आहे.

कोण आहेत अश्विनी भिडे?

अश्विनी भिडे या भारतीय सनदी सेवेतील 1995 च्‍या तुकडीतील अधिकारी आहेत. त्‍यांना सनदी सेवेतील 24 वर्षांचा अनुभव आहे. त्‍यांनी आतापर्यंत महाराष्‍ट्रात विविध महत्‍त्‍वपूर्ण पदांचा कार्यभार सांभाळला आहे. यामध्‍ये प्रामुख्‍याने जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी, विभागीय आयुक्‍त कार्यालयाच्‍या विभागीय अतिरिक्‍त आयुक्‍त, महाराष्‍ट्र शासनामध्‍ये सह सचिव, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (एम.एम.आर.डी.ए.) अतिरिक्‍त आयुक्‍तपद, तसेच शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्‍या सचिव म्‍हणूनही भिडे यांनी काम पाहिले आहे. त्‍याचबरोबर मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्‍या व्‍यवस्‍थापकीय संचालक म्‍हणून त्‍यांनी मुंबई रेल मेट्रोचे जाळे निर्माण करण्‍याच्‍यादृष्‍टीने तंत्रज्ञान आधारित विविध नाविन्‍यपूर्ण उपक्रम राबवून संबंधित पायाभूत सुविधांच्‍या निर्मितीत महत्‍त्‍वाचे योगदान दिले आहे.