मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या काळात महत्त्वाकांक्षी मानल्या जाणाऱ्या मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेला महाविकास आघाडी सरकारनं तत्वत: मान्यता दिलीय. त्याची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी दिलीय. महत्वाची बाब म्हणजे योजना गुंडाळणं किंवा रद्द करणं अशी चर्चा कधीही झाली नसल्याचं देशमुख म्हणाले. मराठवाडा वॉटर ग्रीड हा मराठवाड्यासाठी महत्वाचा प्रकल्प आहे. महाविकास आघाडी सरकारच्या दृष्टीपथात हा प्रकल्प नेहमीच राहिलाय. मात्र कोरोनाच्या संकटामुळे हा प्रकल्प सरकारच्या विचाराधीनच होता असंही देशमुखांनी म्हटलंय. (Approval of Marathwada Water Grid in principle to solve the water problem of Marathwada)
मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीला मराठवाड्यातील मंत्री आणि संबंधित खात्याचे मंत्री उपस्थित होते. या योजनेच्या माध्यमातून औरंगाबाद, बीड आणि लातूर जिल्ह्याला पिण्याचं शाश्वत पाणी मिळणार आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्याला तत्वत: मान्यता दिली आहे. मंत्रिमंडळात याबाबत चर्चा होईल आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्याला अंतिम मंजुरी देतील, अशी माहिती देशमुख यांनी दिलीय.
मराठवाड्यातील हे जिल्हे कायम दुष्काळी आहे. या भागाला कायमस्वरुपी पिण्याचं पाणी देणं ही आमची भूमिका राहिलीय. आज हे स्वप्न पूर्ण होतं आहे, त्याचं समाधान असल्याची भावनाही देशमुख यांनी व्यक्त केलीय. महाविकास आघाडी सरकार मराठवाड्याच्या विकासासाठी बांधील आहे. सुरुवातीच्या काळात सरकार कामाला लागलं पण काही महिन्यातच कोरोना संकट ओढावलं. त्यामुळे विकासाची कामं मागे पडली. पण योजना गुंडाळणं किंवा ती रद्द करणं अशी चर्चा कधीही झाली नाही, असं देशमुख म्हणाले.
लातूर, बीड औरंगाबाद जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या मराठवाडा वॉटर ग्रीड या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याला बुधवारी उपमुख्यमंत्री ना.@AjitPawarSpeaks यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत तत्वत:मंजुरी देण्यात आली. @CMOMaharashtra@bb_thorat@NANA_PATOLE pic.twitter.com/WRdGoBReWe
— Amit V. Deshmukh (@AmitV_Deshmukh) May 20, 2021
मराठवाड्याची तहान भागवण्यासाठी फडणवीस सरकारने वॉटर ग्रीड ही महत्त्वाकांक्षी योजना आखली होती. या योजनेचं काम एका खासगी कंपनीला देण्यात आलं होतं. या योजनेसाठी अंदाजे 10 हजार कोटी दिले होते. ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता आहे, अशा ठिकाणचं पाणी कोरडवाहू भागात आणण्याची ही योजना होती. मात्र अजित पवार यांनी या योजनेच्या व्यवहारिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. तज्ज्ञांनी या योजनेत योग्य व्यवहार झाला नसल्याचं मत व्यक्त केल्याचं पवार म्हणाले होते. त्यामुळे इतर योजनेप्रमाणे ही योजनाही राज्य सरकार गुंडाळणार असल्याचं चित्र निर्माण झालं होतं.
संबंधित बातम्या :
दुष्काळमुक्तीचा ‘पंकजा’ पॅटर्न, जायकवाडीतील पाण्याने बीड व्यापणार
पंकजा मुंडेंच्या प्रयत्नाला यश, बीडमध्ये वॉटर ग्रीडसाठी कॅबिनेटची मंजुरी
Approval of Marathwada Water Grid in principle to solve the water problem of Marathwada