नाशिकमध्ये सकल हिंदू समाजाच्या मोर्चावेळी, जोरदार राडा झाला. दगडफेक झाली, तोडफोड झाली आणि त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला. नाशिकमध्ये सकल हिंदूंच्या मोर्चात तणाव निर्माण झाला. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये रामगिरी महाराजांनी मोहम्मद पैगंबरांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळं वाद झाला. रामगिरी महाराजांच्या अटकेच्या मागणीसाठी मोठा जमाव पोलीस स्टेशनमध्ये जमला. आधी नाशिकमध्ये नेमकं झालं ते पाहुयात. बांग्लादेशातील हिंदूवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधात सकल हिंदू समाजानं नाशिक बंदची हाक दिली.
मोर्चा सुरु झाल्यानंतर नाशिकच्या भद्रकाली परिसरात दुकानं बंद करण्यावरुन 2 गटात वाद झाला. वादानंतर जोरदार दगडफेक झाली तसंच काही वाहनांची तोडफोड झाली. राड्यानंतरही सकल हिंदू समाजाचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचला. तर भाजपच्या आशिष शेलारांनी, हिंदूंच्या मोर्चामुळं पोट दुखणाऱ्यांच्या पाठी सोलून काढा, असं म्हटलं. त्यावरुन अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते मिटकरींनी आक्षेप घेत, आम्ही सेक्युलर आहोत. सोलून काढण्याची भाषा नको, अशा शब्दात महायुतीच्याच नेत्याला खडेबोल सुनावले.
बांगलादेशात हिंदूंवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात आज सकल हिंदू समाजाकडून नाशिक शहर बंदची हाक देण्यात आली होती. सकल हिंदू समाजाच्या या बंदला आज व्यापाऱ्यांनी आणि दुकानदारांनी नाशकात चांगला प्रतिसाद दिला. नाशिकमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. या दरम्यान सकल हिंदू समाजाकडून बांगलादेशमधील हिंदूंवरील अत्याराच्या घटनेच्या विरोधात निषेध मोर्चा आज दुपारी काढण्यात आला. हा मोर्चा नाशिकच्या भद्रकाली परिसरात आला तेव्हा काही दुकानं उघडी होती.
आंदोलकांनी दुकानदारांना दुकानं बंद करण्याचं आवाहन केलं. पण काही दुकानदार दुकान बंद करण्यास तयार नव्हते. यामुळे दोन्ही गटात वाद निर्माण झाला. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थितीत नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले.
शिंदेंच्या शिवसेनेनं नाशिकच्या घटनेवरुन महाविकास आघाडीवर आरोप केलेत. समाजात तेढ निर्माण करुन दंगल घडवण्याचा मविआचा प्रयत्न असल्याचं शिरसाट म्हणालेत. नाशिकमध्ये सध्या तणावपूर्ण शांतता आहे. अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन नाशिक पोलिसांनी केलंय.