मुंबई : ड्रग्जप्रकरणात अभिनेता शहरुख खानच्या मुलाला आर्यन खानला (Aryan Khan) क्लीनचीट मिळाली आहे. एनसीबीकडून त्याला क्लीनचीट देण्यात आली आहे. आर्यन खान याला क्लीनचीट मिळताच प्रसारमाध्यमांनी याबाबत समीर वानखेडे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र समीर वानखेडे यांनी या प्रकरणावर बोलण्यास नकार दिला आहे. आर्यन खान याला क्लीनचीट मिळाली यावर आपली प्रतिक्रिया काय? असा सवाल करताच ” सॉरी, सॉरी मला या प्रकणावर काहीही बोलयाचे नाही, मी सध्या एनसीबीमध्ये नाही, त्यामुळे जे काही विचारायचे असेल ते एनसीबीच्या अधिकाऱ्यांना विचारा’ असे वानखेडे यांनी म्हटले आहे. नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो अर्थात एनसीबीकडून (NCB) शुक्रवारी एनडीपीएस कोर्टात आरोपपत्र (Chargesheet) दाखल करण्यात आले. दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रामध्ये आर्यन खानच्या नावाचा समावेश नव्हता. ड्रग्स केस प्रकरणात आर्यन खान याच्याविरोधात कोणतेही पुरावे मिळाले नसल्याने त्याच्या नावाचा समावेश हा आरोप पत्रात करण्यात आलेला नाही.
शुक्रवारी एनडीपीएस कोर्टात एनसीबीकडून ड्रग्स प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यात आले. मात्र या आरोपपत्रात आर्यन खानच्या नावाचा समावेश करण्यात आलेला नाही. त्याच्याविरोधात कोणतेही पुरावे सापडले नसल्याने त्याला क्लीनचीट मिळाली आहे. आर्यन खानसोबतच साहू आनंद , सुनील सेह यांना देखील क्लीनचीट मिळाली आहे. मात्र दुसरीकडे मुनमुन धमेचा आणि अरबाज मर्चेंट यांना ड्रग्स प्रकरणात आरोपी करण्यात आले आहे. या प्रकरणात धमेचा, मर्चेंट यांच्यासह 14 लोकांचा आरोपपत्रात समावेश करण्यात आला आहे. क्लीनचीट मिळाल्याने आर्यन खानला मोठा दिलासा मिळाला आहे.
मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूजवर दोन ऑक्टोबर रोजी एनसीबीच्या अधिकाऱ्यांकडून छापेमारी करण्यात आली होती. या कारवाईचे नेतृत्त्व एनसीबीचे तत्कालीन झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी केले होते. या क्रूजवर पार्टी सुरू होती. सदरची पार्टी ही ड्रग्स पार्टी होती, अशी माहिती एनसीबीच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार एनसीबीच्या अधिकाऱ्यांकडून छापेमारी करण्यात आली. या छापेमारीमध्ये आर्यन खान अरबाज मर्चंट, मुनमुन धामेचा या तिघांसोबत एकूण आठ जणांना ताब्यात घेतलं होतं. नंतर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती. या संपूर्ण प्रकरणात समीर वानखेडे यांच्यावर देखील अनेक आरोप करण्यात आले. आरोपानंतर त्यांना चौकशीतून बाजूला करण्यात आले होते. अखेर आज आर्यन खान याला एनसीबीकडून क्लीनचीट मिळाली आहे.