विनायक डावरूंग, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 8 नोव्हेंबर 2023 : माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबई महापालिका आणि बेस्ट कर्मचाऱ्यांच्या बोनसवरून मुंबई महापालिका आयुक्तांना सवाल केला होता. अनेक दशकानंतर पहिल्यांदाच पालिका आणि बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनस मिळाला नाही. 24 तासात काय होतंय ते पाहू, असं आदित्य ठाकरे म्हणाले होते. आदित्य ठाकरे यांचं हे ट्विट व्हायरल होताच खळबळ उडाली. थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिका कर्मचारी कामगार संघटनांशी चर्चा करून मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर केला आहे. मात्र, बेस्ट कर्मचाऱ्यांना अद्याप बोनस जाहीर झालेला नाही.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा निवासस्थानी मुंबई महापालिकेच्या सर्व कामगार, कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक घेतली. यावेळी महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहलही उपस्थित होते. या बैठकीत बोनसवर चर्चा झाली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांना 26,000 रुपये बोनस जाहीर केला. तर आरोग्य सेविकांना एका महिन्याचं वेतन बोनस म्हणून देण्यात येणार असल्याचं जाहीर केलं. महापालिका कर्मचाऱ्यांना गेल्या वर्षी पालिका कर्मचाऱ्यांना 22500 बोनस मिळाला होता. यावेळी महापालिका कर्मचाऱ्यांना भरघोस बोनस देण्यात आल्याने महापालिका कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
आदित्य ठाकरे यांनी सकाळी ट्विट करून बोनसच्या मुद्द्यावरून महापालिका आयुक्तांना घेरलं होतं. महापालिका आयुक्तांना एकच महत्त्वाचा प्रश्न असल्याचं ठाकरे यांनी म्हटलं होतं. अनेक दशकांनंतर पहिल्यांदाच मुंबई महापालिका आणि बेस्टच्या कर्मचाऱ्यांना त्यांचा दिवाळी बोनस अद्याप मिळालेला नाही. सीएमओच्या माध्यमातून बीएमसी चालवणारे खोके सरकार (लोकप्रतिनिधींच्या अनुपस्थितीत) दिवाळी बोनस देणार आहे की नाही? देणार असेल, तर कधी? दिवाळी संपल्यावर??, असा संतप्त सवाल आदित्य ठाकरे यांनी केला होता. यावेळी त्यांनी 24 तासात काय होतंय हे पाहू असंही म्हटलं होतं. त्यानंतर संध्याकाळी उशिरा पालिका कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर करण्यात आला आहे.
दरम्यान, कल्याण डोंबिवली महापालिका कर्मचाऱ्यांना दोन दिवसांपूर्वीच घसघशीत बोनस जाहीर करण्यात आला आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मागणीनंतर महानगरपालिका आयुक्तांनी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या बोनसमध्ये 2 हजार रुपयांनी वाढ केली आहे. महापालिका कर्मचाऱ्यांना गेल्यावर्षी 16 हजार 500 रुपये बोनस दिला होता. तर यावर्षी 18 हजार 500 रुपये बोनस जाहीर करण्यात आला आहे. महापालिका आयुक्तांनी बोनस जाहीर करताच शिंदे गटातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी महानगरपालिकेच्या मुख्यालयाच्याबाहेर फटाके फोडत, ढोल ताशे वाजवत जल्लोष केला होता.