मुंबई : मुंबईचा पावसाळा (Mumbai Rain) म्हणजे जणू मुंबईकरांसाठी आव्हानच असते. कारण पावसाळ्यात मुंबई तुंबणे हे मुंबईकरांसाठी नेहमीचं झालं आहे. दरवर्षी मार्च महिन्यात मुंबईत नालेसफाईच्या कामांना सुरुवात होते. यावेळी अद्याप कंत्राटच मंजूर झालेले नाही. त्यामुळे आता जरी मंजुरी दिली तरी 15 एप्रिल नंतरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, असा आरोप भाजपकडून करण्यात आलाय. सुमारे 375 कि. मी.चे नाले अवघ्या दीड महिन्यात कसे साफ होणार? त्यामुळे तातडीने कामांना मंजुरी द्या अशी मागणी करीत भाजपा नेते आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी पालिका आयुक्त आणि प्रशासक इक्बाल चहल (BMC Commissioner Iqbal Chahal) याची भेट घेतली. पालिका प्रशासनाने निविदा काढून 7 मार्चला स्थायी समितीत 160 कोटींचा प्रस्ताव मंजूरीसाठी आणला होता.पण सत्ताधाऱ्यांनी तो राखून ठेवला. त्यानंतर पालिकेची मुदत संपली प्रशासक नियुक्ती झाली. एवढा उशिरा सुरुवात करुन कामे कशी पुर्ण होणार, जर कामे वेळेत पुर्ण झाली नाही तर मुंबईकरांना यावेळी पावसाळ्यात भयाण परिस्थितीला सामोरे जावे लागेल, अशी भिती भाजपा आमदार आशिष शेलार यांनी व्यक्त केली आहे.
तसेच भाजपाच्या स्थापना दिना निमित्ताने 6 एप्रिल ते 14 एप्रिल हा सेवा सप्ताह साजरा केला जाणार आहे. या निमित्ताने मुंबईतील नालेसफाईच्या कामांची पाहणी व देखरेख केली जाणार असल्याचे आमदार आशिष शेलार यांनी नुकतेच जाहीर केले आहे. मात्र अद्याप कंत्राटदारच नियुक्ती करण्यात आली नाही त्यामुळे तातडीने आमदार आशिष शेलार यांनी पालिका आयुक्तांची मुख्यालयात जाऊन भेट घेतली व नियमानुसार पारदर्शक पध्दतीने कंत्राटदार नियुक्ती करुन तत्काळ कामांना सुरुवात करावी अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान याबाबत बोलताना आमदार आशिष शेलार म्हणाले की, मुंबईकरांना वाऱ्यावर सोडून सत्ताधारी फरार झाले असून 7 मार्चच्या स्थायी समितीच्या बैठकीत का प्रस्ताव राखून ठेवला? काही अंडरस्टॅंडिंग बाकी होते का? हे असले कारभारी. मुंबईकरांपेक्षा स्वतःच्याच मालमत्तांची चिंता भारी, अशी टीका त्यांनी केली आहे. सत्ताधारी पक्षाने पळ काढला तरी आम्ही या विषयाचा पाठपुरावा करणार, वेळेत कामे पुर्ण व्हावीत, पुर्ण गाळ काढला जाईल, भ्रष्टाचार होणार नाही यासाठी आम्ही मुंबईकरांच्या वतीने या सगळ्या प्रक्रियेवर लक्ष ठेवून राहणार असल्याचे ही त्यांनी जाहीर केले आहे.
Raj Thackeray Gudipadwa Speech : राज ठाकरेंचा टिझर आला, गुढी पाडव्याच्या “पिक्चर”मध्ये टार्गेट कोण?