मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक मागच्या वर्षभरात दोनदा पुढे ढकलण्यात आली. यावरून चर्चांना उधाण आहे. भाजपचे नेते आशिष शेलार यांनी सिनेट निवडणुकीवर बोलताना शिवसेना उद्धव ठाकरे गटावर निशाणा साधला आहे. सिनेटच्या उद्या हाऊ घातलेल्या निवडणुका अराजकीय व्हाव्यात, अशी भाजपची इच्छा आहे. जे उमेदवार ठाकरे गटाने दिलेत ते विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी आहेत का? सगळ्या निवडणुकीची राजकीय बोळवण केली आहे. ठाकरे गटाचे उमेदवार मालकाचे हित जोपासणारे, त्यांच्याकडून निवडणूक प्रक्रियेला हरताळ फासलं जात आहे, असं आशिष शेलार म्हणाले.
मुंबई विद्यापीठाच्या कामकाजामध्ये लोकशाही प्रक्रियेमध्ये ज्याचं स्थान आहे, अशी असलेली अधिसभा ज्याला आपण सिनेट निवडणूक म्हणतो. त्या सिनेट निवडणुकीबाबत बोगस मतदार नोंदणी झाली. तेव्हाही आम्ही आक्षेप घेतला. आधी नोंदवले गेलेले पदवीधर सेनेच्या शाखेतून निर्माण केलेले पदवीधर होते. निवडणुकीत राजकीय पक्षाचे झेंडे दिसू नयेत अशी कुलगुरूंना विनंती आहे. अभाविप विद्यार्थ्यांसाठीची एकमेव संघटना या निवडणुकीत आहे. त्यांना मुद्दा मांडण्याचा अधिकार आहे. अभाविपच्या मताशी भाजप सहमत नाही, असंही आशिष शेलार म्हणालेत.
अजित पवार यांनी महायुतीतून बाहेर काढण्यासाठी भाजप आणि शिवसेना शिंदे चक्रव्यूह रचत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. यावरही आशिषे शेलारांनी भाष्य केलं आहे. ही कपोलकल्पित बातमी आहे. भाजप शिंदे सेना आणि अजितदादांचा सामना करण्याची ताकद महाविकास आघाडी हरवून बसली आहे. खोट्या बातम्यांचं राजकीय षडयंत्र रचलं जात आहे. जेव्हा उद्धव ठाकरे दिल्लीहून आले आणि मेळाव्यात मुख्यमंत्री पदाबाबत भूमिका घेतली. तेव्हाच काँग्रेस आणि पवारांच्या राष्ट्रवादीने वेळ पडली तर ठाकरे सेनेला सोडून निवडणूक लढण्याची तयारी केली आहे, असं आशिष शेलारांनी म्हटलं आहे.
नाना पटोले हेच राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत, असं काँग्रेसच्या नेत्यांकडून म्हटलं जात आहे. काँग्रेस नेते विकास ठाकरे यांनी याबाबतचा दावा केला आहे. त्यावर आशिष शेलारांनी प्रतिक्रिया दिली आहे. मविआतील पक्षांना मुख्यमंत्रिपदाची स्वप्न पडू लागली आहेत. महाराष्ट्रातील मतदार हे पाहतोय. महाराष्ट्र हिताबाबत यांना चिंता नसून मुख्यमंत्रिपदाचा हव्यास लागला आहे. मुख्यमंत्रिपदाचा भसम्या मविआतील तिन्ही नेत्यांना झाला आहे, असं आशिष शेलार म्हणाले.