Assembly election 2024 : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. त्या पार्श्वभूमीवर आता राज्यातील सर्वत्र पक्ष अॅक्शन मोडवर आल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या सर्व पक्षांसह नेत्यांकडूनही जोरदार मोर्चेबांधणी केली जात आहे. त्यातच जागावाटप, मतदारसंघाची चाचपणीही सुरु करण्यात आली आहे. अशातच आता महाविकासाआघाडीचा घटक पक्ष असलेल्या काँग्रेसने मुंबईतील 18 जागांची मागणी केली आहे. त्यात अनेक उच्चभ्रू मतदारसंघाचा समावेश आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील 36 मतदारसंघांपैकी 18 मतदारसंघांची आग्रही मागणी काँग्रेसने केली आहे. यात मलबार हिलसारख्या उच्चभ्रू मतदारसंघासह धारावीसारख्या आशिया खंडातील सर्वाधिक मोठी झोपडपट्टी असलेल्या मतदारसंघाचाही समावेश आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटाने मुंबईतील 20 जागांची मागणी केली आहे. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाने 7 जागांवर दावा केला आहे.
काँग्रेसने मुंबईतील 18 जागांची मागणी केली आहे. यानुसार काँग्रेसने धारावी, चांदिवली, मुंबादेवी, मालाड पश्चिम, सायन कोळीवाडा, कुलाबा, कांदिवली पूर्व, अंधेरी पश्चिम, वर्सोवा, वांद्रे पश्चिम, घाटकोपर पश्चिम, कुर्ला, भायखळा, जोगेश्वरी पूर्व, मलबार हिल, माहीम, बोरिवली आणि चारकोप या जागांवर लढण्याची तयारी केली आहे.
तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने 20 जागांसाठी आग्रह धरला आहे. तसेच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने ७ जागांवर दावा केल्याचे बोललं जात आहे. मुंबईत 2019 साली ठाकरे यांच्या शिवसेनेने ३६ पैकी १९ जागा जिंकल्या होत्या. भाजपने ११ जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसने २८ पैकी ४ जागा जिंकल्या होत्या. तर राष्ट्रवादी १ जागा आणि समाजवादी पक्षाने १ जागा जिंकली होती. तर राज्यात २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला १०५ जागा मिळाल्या. तर शिवसेनेला ५६ जागा, राष्ट्रवादी काँग्रेस ५४ जागा आणि काँग्रेस ४४ जागा मिळाल्या होत्या.
आता विधानसभा निवडणुकीसाठी आता महायुती आणि महाविकासाआघाडी जागावाटपाचा फॉर्म्युला काय असणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. गणेशोत्सवानंतर जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित करण्यासाठी मॅरेथॉन बैठक घेतली जाईल. यानुसार विधानसभेच्या २८८ जागांपैकी १०५ जागांची मागणी काँग्रेसने केली आहे. तर शिवसेना ठाकरे गटाने १०० जागा मागितल्या आहेत. तर शरद पवार गटाने ९० जागांची मागणी केली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाविकासआघाडीत सध्या जागा वाटपाबद्दल सातत्याने चर्चा होत आहे. यानुसार काँग्रेसने १०० ते १०५ जागांवर लढण्याची तयारी केली आहे. तर शरद पवार गटाने ८५ ते ९० लढण्याची तयारी सुरु केली आहे. त्यासोबतच ठाकरे गटाने ९५ ते १०० जागांवर लढण्याचा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सवानंतर महाविकासाआघाडीच्या अनेक बैठका होताना दिसणार आहे. या सर्व बैठका पितृपक्षात होतील. त्यानंतर नवरात्रीपूर्वी किंवा नवरात्रीदरम्यान जागावाटपाबद्दल अंतिम निर्णय जाहीर केला जाईल.