मुंबई: विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आज अर्ज भरायचा असतानाच राज्य सरकारला मोठा धक्का बसला आहे. विधानसभा अध्यक्षपदासाठी नियम बदलण्यात आले. ही प्रक्रियाच घटनाबाह्य असल्याचं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सरकारला कळवलं आहे. त्यामुळे आघाडीला मोठा धक्का बसला असून अध्यक्षपदाची निवडणूक रेंगाळण्याची चिन्हे दिसत आहेत.
विधानसभा अध्यक्षाच्या निवड प्रक्रियेबाबत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राज्य सरकारला पत्रं पाठवून उत्तर दिलं आहे. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी नियम बदलची प्रक्रिया घटनाबाह्य असल्याचा उल्लेख राज्यपालांनी पत्रात केला आहे. त्यामुळे उद्या विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार की नाही याबाबतची साशंकता निर्माण झाली होती.
काल राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी काल राज्यपालांची भेट घेऊन त्यांना विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया बदलण्यात आली असून त्याला मंजुरी देण्याची विनंती केली होती. त्यावर राज्यपालांनी उद्यापर्यंत सांगतो असं उत्तर दिलं होतं. त्यानुसार राज्यपालांनी आपला अभिप्राय कळवला असून थेट निवड प्रक्रियेवरच बोट ठेवलं आहे.
राज्य सरकारने अध्यक्षपदाच्या निवडणूक प्रक्रियेत बदल केला होता. पूर्वी गुप्त मतदानाने ही निवडणूक होत होती. मात्र, सरकारने विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक खुल्या पद्धतीने घेण्यासाठी नियम बदलला होता. आवाजी मतदानाने निवडणूक घेण्याचा हा निर्णय घेण्यात आल्याने तो घटनाबाह्य असल्याचं राज्यपालांचं म्हणणं आहे.
आम्ही मुख्यमंत्र्यांच्या सहीने त्यांना पुन्हा पत्रं पाठवणार आहोत. नियम काय आहे आणि विधिमंडळाचं काम काय आहे हे आम्ही त्यांना सांगणार आहोत. त्यानंतर त्यांचा काय रिप्लाय असेल तो बघू. घटनाबाह्य आहे की नाही हे पाहून उद्या निवडणूक करणारच आहोत. आवाजी मतदानानेच ही निवडणूक होईल. नियम बदलण्याचा अधिकार विधिमंडळाला आहे. त्यामुळे काही अडचण नाहीये, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलं. आम्हीच नाही तर इतर राज्यांनीही असे नियम बदलले आहेत. लोकसभेतही हीच पद्धती आहे, असंही त्यांनी सांगितलं.
4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 27 December 2021 pic.twitter.com/GFc4AJvllD
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 27, 2021
संबंधित बातम्या: