मुंबई: सुशांतसिंह राजपूत प्रकरणात शवविच्छेदन अहवाल अद्याप अधिकृत झालेला नसताना सुद्धा राज्याच्या गृहमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर आरोप करणे हे हास्यास्पद आहे. निष्क्रिय कारभारामुळे महाराष्ट्राला बदनाम करण्याचे काम करणाऱ्या महाविकास आघाडी नावाच्या सर्कशीतला ‘जोकर’ होण्याचा प्रयत्न अनिल देशमुख यांनी करू नये, अशी टीका भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांनी केली. महाराष्ट्रानं इतका राजकीय गृहमंत्री उभ्या इतिहासात पाहिला नाही,असंही भातखळकर म्हणाले आहेत. (Atul Bhatkhalkar criticize Home Minister Anil Deshmukh )
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषद घेत राज्याची बदनामी करण्याचे काम भाजप व देवेंद्र फडणवीसांनी केल्याचा आरोप केला होता. अतुल भातखळकर यांनी देशमुखांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध केला आहे. गृहमंत्र्यांनी त्यांच्यात असलेल्या सर्व क्षमता वापरून वाटेल ती चौकशी करावी, भाजप कोणत्याही प्रकारच्या चौकशीसाठी सदैव तयार असून, केवळ विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी चौकशीच्या धमक्या देण्याची सवयच अनिल देशमुख यांना असल्याची टीका भातखळकरांनी केली.
‘फोन टॅपिंग’ प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करणार असल्याचे गृहमंत्र्यांनी विधानसभा सभागृहात सांगितले होते. त्या चौकशीचे काय झाले हे महाराष्ट्राच्या जनतेला सांगावे, असे आव्हान भातखळकरांनी दिले आहे.
ठाकरे सरकारने पोलिसांच्या बदनामीची काळजी करण्यापेक्षा पोलिसांवर राजकीय दबाव टाकण्याचे काम बंद करावे. महाराष्ट्रानं इतका राजकीय गृहमंत्री उभ्या इतिहासात पाहिला नाही, अशा शब्दात भातखळकरांनी देशमुखांवर टीका केली. गृहमंत्र्यांनी कोरोना सेंटरमध्ये महिलांवर होत असलेल्या अत्याचारांवर, पुणे शहरात सोमवारी झालेल्या गोळीबाराकडे लक्ष द्यावं. अन्यथा महिलांवरील अत्याचार, बलात्कार, दिवसाढवळ्या होणारे खून आणि गंभीर गुन्हे यात महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकांवर जाण्यास वेळ लागणार नाही. हे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी लक्षात घ्यावे, असा सल्ला अतुल भातखळकर यांनी दिला.
संबंधित बातम्या :
अनिल देशमुख, तुम्ही पुढाऱ्यासारखं बोलू नका, तुम्ही तर गृहमंत्री : प्रवीण दरेकर
सुशांतने आत्महत्या केल्याचं मुंबई पोलिसांचा दोन दिवसांत निष्कर्ष, तर सीबीआयला दोन महिने लागले: भुजबळ
(Atul Bhatkhalkar criticize Home Minister Anil Deshmukh)