मुंबई : झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणातील (SRA) सदनिका धारकांना घराच्या बाहेर काढण्याचा मुद्दा सध्या चांगलाच तापलाय. या विरोधामध्ये शिवसेनेने आणि इमारत दुरुस्ती महामंडळाचे अध्यक्ष विनोद घोसाळकर यांनी भूमिका घेणे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत, अशी जोरदार टीका भाजप मुंबई प्रभारी आणि कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे (Atul Bhatkhalkar criticize Shivsena over SRA houses issue in Mumbai).
अतुल भातखळकर म्हणाले, “मुळातच 10 वर्षांच्या आत खरेदी-विक्री केलेल्या लोकांना संरक्षण देण्याचा कायदा देवेंद्र फडणवीस सरकारने केला. त्याला कॅबिनेटने मंजुरी दिली. त्यावेळच्या महाधिवक्ता यांनी हा कायदा वैध ठरवला. आता ठाकरे सरकारला गेल्या वर्षभरामध्ये फक्त न्यायालयामध्ये यासंदर्भातली बाजू मांडायची होती. परंतु एवढे काम सुद्धा ठाकरे सरकारने केले नाही. त्यामुळे ठाकरे सरकारला या लोकांना संरक्षण देण्यामध्ये रस नाही हे स्पष्ट होते.”
बुधवारी (17 फेब्रुवारी) भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले तेव्हा या संदर्भातल्या गोष्टीची गंधवार्ताही मुख्यमंत्र्यांना नव्हती, अशीही टीकाही भातखळकर यांनी केली. “त्यामुळे शिवसेनेने निवेदन देणे आणि मागणी करणे असली नाटकबाजी बंद करावी. झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणातल्या सदनिकाधारकांना संरक्षण देण्याकरिता गाढ झोपेत असलेल्या ठाकरे सरकारला जागे करून उच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्यास किंवा आजच्या आज सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊन उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला स्थगिती देण्यास सांगावे,” अशी मागणी भातखळकर यांनी केली.
‘शिवसेनेकडून फक्त कांगावा करणे आणि खोटे दावे करण्याचे उद्योग सुरु’
अतुल भातखळकर म्हणाले, “आधीच्या सरकारचं चांगलं काम साधं पुढे नेण्याची सदबुद्धी आणि नीतिमत्ताही या सरकारकडे नाही. याच्या उलट फक्त कांगावा करणे, आम्हीच तारणार आहोत, खोटा दावा करणे हे शिवसेनेचे उद्योग चालू आहेत. परंतु याच्यामुळे एस. आर. ए. तील सदनिकाधारक फसणार नाहीत.”
“मुंबई भाजप एकाही सदनिकाधारकांना घरातून बाहेर काढू देणार नाही. यासंदर्भात ज्यांना कोणाला नोटिसा आल्या असतील त्यांनी आपापल्या ठिकाणच्या भाजप लोकप्रतिनिधींशी, कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा. भाजप त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे,” असे आवाहनही भातखळकर यांनी केले.
हेही वाचा :
आम्ही धमक्यांना भीक घालत नाही, आमचे कार्यकर्ते संघाच्या मुशीत तयार झालेत, प्रविण दरेकरांचा इशारा
चित्रा वाघ यांच्यानंतर अजून एका भाजप नेत्याला धमकीचा फोन!
संजय राठोड यांची हकालपट्टी करा, पूजा चव्हाण प्रकरणावरुन अतुल भातखळकर आक्रमक
व्हिडीओ पाहा :
Atul Bhatkhalkar criticize Shivsena over SRA houses issue in Mumbai