मुंबई: कोणत्याही परिस्थितीत औरंगाबादचं संभीजनगर होणार हे नक्की, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले. औरंगाबादच्या नामांतराला काँग्रेस पक्षाकडून होणाऱ्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर राऊत यांचा हा ठाम पवित्रा सूचक मानला जात आहे. (Sanjay Raut on Aurangabad name changing issue)
संजय राऊत हे बुधवारी मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांना अहमदनगरच्या नामांतराच्या मागणीविषयी विचारणा करण्यात आली. तेव्हा राऊत यांनी अशा मागण्या होतच असतात. पण औरंगाबादचं संभाजीनगर होणार हे नक्की, असे वक्तव्य केले. त्यामुळे आता महाविकासआघाडीत पुन्हा कुरबुरी सुरु होण्याची शक्यता आहे.
यापूर्वी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार या नेत्यांनी औरंगाबादच्या नामांतरावरुन शिवसेनेविरोधात उघडपणे भूमिका घेतली होती. त्यावरुन मध्यंतरी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून काँग्रेस नेत्यांना चिमटेही काढण्यात आले होते. मुस्लीम व्होट बँक दुरावेल या भीतीपोटीच काँग्रेस नामांतराला विरोध करत असल्याची टीका राऊतांनी केली होती. हिंदुस्थानची घटना सेक्युलर आहेत. म्हणून बाबर, औरंगजेब, शाहिस्तेखान, ओवेसी वगैरे लोकांना सेक्युलर कसे मानावे? औरंगजेबाला परधर्माचा भयंकर तिटकारा. त्याने शिखांचा हिंदूंचा छळ केला. त्यांच्या खुणा आपण का जतन कराव्या? असा सवाल संजय राऊत यांनी काँग्रेसला विचारला होता.
औरंगाबादच्या नामांतराचा विषय हा व्होटबँकेचा मुद्दा नाही. हा लोकभावनेचा विषय आहे. त्यामुळे राज्यातच काय देशातही औरंगजेबाच्या नावाबाबत कुणीही आग्रही असू नये. औरंगाबादच्या नामांतराचा विषय माझ्यासाठी संपला आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांचा निर्णय झाला आहे, असेही संजय राऊत यांनी सांगितले होते.
संबंधित बातम्या:
आमचा सरकारमध्ये समान अधिकार, औरंगाबादच्या नामांतराला विरोध, काँग्रेसने ठणकावलं
नियम मोडला तर उद्धव ठाकरे आपल्या जवळच्या व्यक्तीलाही सोडत नाहीत: संजय राऊत
संजय राठोड यांच्यावर शरद पवार नाराज?, संजय राऊत म्हणतात…
(Sanjay Raut on Aurangabad name changing issue)