राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणात नवी माहिती समोर आली आहे. आरोपींच्या पोलीस चौकशीत याबाबतची महत्त्वाची माहिती समोर आल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हत्येच्या दिवशी बाईकचाच वापर करणार होते. पण हत्येच्या आधी बाईकवरून दोन आरोपी पडले होते. त्यामुळे त्यांनी बाईकवरून जाण्याचा निर्णय रद्द केला आणि रिक्षा वापरली. आरोपींनी पोलीस चौकशीत ही माहिती दिली. तसेच बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर तीनही आरोपींनी स्वत:चे कपडे बदलल्याचं समोर आलं आहे. त्यांनी पळून जाण्यासाठी हा प्लॅन केला होता.
या प्रकरणातील आरोपी शुभम लोणकर याने हरीशकुमार बालकरामला 60 हजार रुपये बँक खात्यातून ट्रान्सफर केले होते. त्यापैकी ३२ हजारांची आरोपींनी जुनी आपाची कंपनीची बाईक घेतली होती. याच बाईकवरून आरोपीनी अनेकदा बाईकवरून रेकी केल्याच समोर आलं आहे. आरोपींनी घटनेच्या दिवशी गोळीबार झाला त्या ठिकाणी जवळपास तासाभरापासून वाट पाहत उभे होते.
पोलिसांना तुर्किश मॉडलची बंदूक काल सापडलेल्या एका बॅगमध्ये सापडली आहे. आरोपींनी वापरलेल्या बंदुकीपैंकी एक ऑस्ट्रेलियन, एक तुर्किश आणि एक देशी बनावटीचे पिस्तूल अशा तीन बंदुकांचा समावेश आहे. आरोपी शिवकुमारने जी बॅग पळून जाताना फेकली त्यामध्ये एक बंदूक, एक आधारकार्ड आणि एक शर्ट पोलिसांना सापडले आहे. याच बॅगमध्ये बाईक विकत घेतल्याचे ३२ हजारांचे बिल सापडले आहे. हत्येदिवशी आरोपीनी ज्या रिक्षाचा आधार घेतला त्या रिक्षाचालकाचा शोध सुरू आहे.
दरम्यान, बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर अभिनेता सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. सलमान खानच्या सुरक्षेसाठी जवळपास 100 मुंबई पोलीसांचे जवान तैनात आहेत, ज्यामध्ये काही पोलीस सिव्हिल ड्रेसमध्ये आहेत. सलमान खानच्या गॅलेक्सी घराबाहेर असलेली कार त्याच्या स्कॉटची आहे. याशिवाय त्याच्या घराबाहेर २४ तास पोलीस तैनात असणार आहेत. सीसीटीव्हीच्या मदतीनेही सुरक्षेवर लक्ष ठेवले जात आहे. सध्या सलमान खानच्या घराबाहेर सर्वत्र ठिकाणी पोलीस तैनात आहेत. त्यांच्या घराबाहेर पोलीस छावणी स्वरूप झाले आहे. बाबा सिद्दीकी हे सलमान खानच्या जवळचे होते. त्यांच्या हत्येनंतर सध्या पोलीस सतर्क झाले आहेत.