अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची शनिवारी रात्री गोळ्या घालून हत्या करण्यात आली. मुंबई पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून दोघांच्या मुसक्या आवळल्या. पुढील तपास पोलीस करत आहेत. या प्रकरणात आता एकामागून एक धक्कादायक खुलासे होत आहेत. बाबा सिद्दीकी यांच्या मारेकऱ्यांना अगोदरच पैसे मिळाले होते. मारेकऱ्यांना किती रक्कम देण्यात आली हे समोर आलेले नाही. तर त्यांच्या दैनंदिनी मारेकऱ्यांपर्यंत पोहचवण्यात आली होती. त्यांच्या ठिकाण्यांची मारेकऱ्यांनी अगोदरच रेकी केलेली होती. तर सिद्दीकी यांना मारण्यासाठीचे पिस्तूल कुरियरने या मारेकऱ्यांपर्यंत पोहचवण्यात आले होते, असे आता पुढे येत आहे.
मारेकऱ्यांचा कुर्ला परिसरात मुक्काम
बाबा सिद्दीकी यांच्यावर हल्ला करणारे आरोपी आणि या सर्व प्रकरणाची क्रोनोलॉजी पोलीस उलगडत आहेत. त्यात अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. सिद्दीकी यांना मारण्याचा मास्टर प्लॅन अगोदरच तयार होता. त्याची शनिवार अंमलबाजवणी केल्याचे समोर आले आहे. आरोपी हे गेल्या दीड महिन्यांपूर्वीच मुंबईत आले होते. ते कुर्ला परिसरात मुक्कामी होते. यापूर्वी सुद्धा त्यांनी सिद्दीकी यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला होता. पण काही कारणांमुळे त्यांचा बेत रद्द झाला होता. पण दसऱ्याच्या दिवशी त्यांनी सिद्दीकी यांच्यावर गोळीबार केला.
दिल्ली-मुंबई पोलिसात संपर्क
आतापर्यंत पोलिसांनी तपासात मोठी गती घेतली आहे. अटक केलेल्या शूटर्स हे लाँरेन्स बिश्नोई गँगशी संबंधित असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर मुंबई आणि दिल्ली पोलिस एकमेकांच्या संपर्कात आहे. या गँग आणि आरोपींविषयीची माहिती शोधण्याचा प्रयत्न होत आहे. धागेदोरे शोधण्यात येत आहे.
घटनास्थळी मिळाल्या 6 गोळ्या
मुंबई पोलिसांनी बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळ्या झाडण्यात आलेल्या परिसरात तपास केला. या ठिकाणी त्यांनी 6 बुलेट शेल मिळाल्या. त्यातील तीन गोळ्या या बाबा सिद्दीकी यांना लागल्या होत्या. तर गोळी त्यांच्या जवळील व्यक्तीच्या पायात घुसली. तो गंभीर जखमी झाला. शनिवारी रात्री लीलावती रुग्णालयात त्या व्यक्तीवर उपचार करण्यात आले.