माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणात अजून नवीन ट्विस्ट आला आहे. काल शनिवारी रात्री त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. रेकी केल्यानंतर आणि पाळत ठेवल्यानंतर तीन आरोपींनी त्यांच्यावर जवळून गोळीबार केला. त्यात त्यांचा मृत्यू झाला होता. लॉरेन्स बिश्नोई गँगने या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. दरम्यान पोलिसांनी रात्रीतूनच तपासचक्र फिरवत मारेकऱ्यांना अटक केली. त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यानंतर आरोपींना किल्ला कोर्टात हजर करण्यात आले. तेव्हा एका आरोपीने वयाबाबत मोठी खेळी खेळल्याचे समोर आले आहे.
मी तर अल्पवयीन
माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणात कोर्टात आरोपीने वयाबाबत कोर्टासमोर मोठा खुलासा केला. त्याच्या मते तो केवळ 17 वर्षांचा असून त्याला अल्पवयीन म्हणून या प्रकरणात ग्राह्य धरावं.सुनावणीदरम्यान कोर्टाने प्रश्न विचारताच आरोपीने स्वत:चे वय 17सांगितलं. अल्पवयीन आरोपी म्हणून ट्रिटमेंट मिळवण्यासाठी आरोपीने ही माहिती दिली. आरोपीच्या वकिलाने पण आरोपीचे वय 17 असल्याचं युक्तिवाद केला. कोर्टाने आरोपी धर्मराज कश्यपचे आधार कार्ड मागवले. नेमक वय काय हे स्पष्ट होण्यासाठी कोर्टाने आरोपीचे आधार कार्ड मागितले.
शिवानंद पळणार तरी कुठपर्यंत?
माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणाचा छडा मुंबई पोलिसांनी लागलीच लावला. अवघ्या काही तासातच पोलिसांनी धागेदोरे शोधले. पोलिसांनी तीन ही मारेकऱ्यांची कुंडलीच बाहेर काढली. करनैल सिंह आणि धर्मराज कश्यप तर शिवानंद असे तिघे मारेकरी आहेत. लॉरेन्स बिष्णोई गँगेशी संबंधित या आरोपींची शिताफीने ओळख पटवण्यात आली आहे. तिसरा आरोपी शिवानंद राज्यबाहेर पळाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. त्याचे शेवटचे लोकेशन पनवेल आढळले. तो तिथल्या सीसीटीव्हीत कैद झाला होता. त्याला पकडण्यासाठी पोलिसांचे पथक त्याच्या मागावर धाडण्यात आली आहे. आरोपींच्या शोधासाठी उज्जेन (मध्यप्रदेश), हरियाणा, यूपी, दिल्ली या ठिकाणी गुन्हे शाखेची पथक गेली आहेत. बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करणारा तिसरा आरोपी शिवानंद हा गुरमेल कैथल जिल्ह्यातील नरड या गावचा आहे. 2019 मध्ये एका तरुणाच्या हत्येप्रकरणात तो काही दिवस जिल्हा कारागृहात होता. जामीन मिळाल्यानंतर तो मुंबईत आला होता.