मुंबई | 10 ऑक्टोबर 2023 : दादर येथील मुंबई महानगर पालिकेच्या स्विमिंग पूलात चक्क मगरीचे पिल्लू आढळल्याने काही दिवसांपूर्वी खळबळ उडाली होती. मगरीचे हे पिल्लू नेमके कोठून आले याविषयी तर्कवितर्क सुरु असताना या पालिकेच्या स्विमिंग पुलाशेजारी असलेल्या एका प्राणी संग्रहालयावर मुंबई महानगर पालिका आणि वनखात्याने कारवाई केली आहे. या प्राणी संग्रहालयातूनच हे मगरीचे पिल्लू स्विमिंग पुलात शिरल्याचा आरोप होत आहे.
दादर येथील मुंबई महानगर पालिकेच्या महात्मा गांधी जलतरण तलावात मगरीचे एक छोटे पिल्लू आढळल्याने एक खळबळ उडाली होती. हे मगरीचे पिल्लू अचानक या तरणतलावात आले कुठून असा सवाल निर्माण झाला होता. मात्र आता या पुलाच्या शेजारी असलेल्या एका प्राणी संग्रहालयातून हे मगरीचे पिल्लू आले असल्याचा आरोप मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केला होता. या पुलाच्या शेजारी असलेल्या प्राणी संग्रहालयाच्या पडद्याखालून मगरीचे पिल्लू जात असल्याचे दिसत असल्याचा एक व्हिडीओही सादर करण्यात आला होता.
मुंबई महानगर पालिकेने एमआरटीपी कायद्यानूसार या प्राणी संग्रहालयाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तसेच या प्राणी संग्रहायलात उभे केलेले शेड्स बेकायदा असून ते हटविण्यात आले आहेत. तसेच वन विभागाने देखील काही दिवसांपूर्वी येथे सर्च ऑपरेशन केले होते. तसेच येथून एका अजगराचे पिल्लू देखील जप्त करण्यात आले होते. दरम्यान, या प्राणी संग्रहालयाचे प्रमुख युवराज मोघे यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. पालिकेने शेड्स हटविल्याने आता प्राण्याची काळजी कशी घेणार ? तसेच झालेले नुकसान कोण भरुन काढणार ? असा सवालही युवराज मोघे यांनी केला आहे.