मुंबई : मंत्रीपद मिळाले नाही म्हणून मी नाराज नाही, असे वक्तव्य आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी केले आहे. शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाच्या पहिल्या टप्प्यातील विस्तार नुकताच झाला. मात्र यात बच्चू कडूंचा समावेश नव्हता. आपले नाव मंत्रिमंडळ यादीत नसल्याने त्यावेळी बच्चू कडू यांनी जाहीर नाराजीही व्यक्त केली होती. आपल्याला शब्द देण्यात आला होता, असेही ते म्हणाले होते. आता अधिवेशन (Assembly session) सुरू आहे. त्यानिमित्त मुंबईत आले असता त्यांना याविषयी विचारण्यात आले. त्यावर आपण नाराज नाही. 15 सप्टेंबरपर्यंत मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या टप्प्यातील विस्तार (Cabinet expansion) होणार आहे. तेव्हा माझा विचार केला जाणार आहे, असा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले आहे. तसेच आपण नाराज नाही, असेदेखील ते म्हणाले.
मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी झाला. त्यानंतर तब्बल दीड महिन्यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. तोदेखील मर्यादित स्वरुपात. यावेळी भाजपा आणि शिंदे गटाच्या प्रत्येकी 9 मंत्र्यांनी शपथ घेतली. मात्र एकनाथ शिंदे यांच्यासोबत सर्व मिळून 50 आमदार आल्याने प्रत्येकालाच महत्त्वाकांक्षा, मंत्रीपदाची अपेक्षा होती. पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात मात्र अनेकांचा अपेक्षाभंग झाला. काहींनी जाहीर नाराजीही व्यक्त केली. यात संजय शिरसाट तसेच बच्चू कडू यांचाही समावेश आहे. मात्र आता आपण नाराज नाही, असे बच्चू कडू म्हणाले आहेत.
सामाजिक न्याय, अपंग कल्याण मंत्रीपद तसेच अमरावतीचे पालकमंत्रीपद अशा बच्चू कडूंच्या मागण्या आहेत. मात्र पहिल्या विस्तारात त्यांना संधी देण्यात आली नव्हती. आपण नाराज आहोत, असे नाही. व्यक्तीगत हितासाठी आम्ही नाराज होणार नाहीत. आमचे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत, त्यावर आमची लढाई सुरू राहील. शिवाय पुढील मंत्रिमंडळ विस्तारात बच्चू कडू मंत्रिमंडळात असतील, असा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले.