मुंबई : मंत्रीपद हा आमचा अधिकार आहे, अशी प्रतिक्रिया आमदार आणि शिंदे गटाचे नेते बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी दिली आहे. पहिल्या टप्प्यात होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात बच्चू कडू यांचे नाव नाही. यावरून बच्चू कडू यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच पहिल्या टप्प्यात कोणत्याही अपक्ष आमदारांना मंत्रिमंडळात (Cabinet expansion) स्थान देण्यात आलेले नाही. राजभवनातील (Raj bhavan) दरबार हॉलमध्ये ठेवलेल्या खुर्च्यांमध्ये संदिपान भुमरे, दादा भुसे, उदय सामंत, सुरेश खाडे, राधाकृष्ण विखे पाटील, विनोद तावडे, गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, रवींद्र चव्हाण, तानाजी सावंत, दीपक केसरकर, अब्दुल सत्तार, शंभुराज देसाई, मंगल प्रभात लोढा, विजयकुमार गावीत, सुधीर मुनगंटीवार, गुलाबराव पाटील, संजय राठोड अशा विविध नेत्यांची नावे दिसत आहेत. आता यावरून बच्चू कडू नाराज असल्याचे दिसत आहे.
आमचा प्रहार पक्ष आहे. मित्रपक्षांशिवाय सरकार चालत नाही. त्यामुळे निश्चितच यावर निर्णय होईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला शब्द दिला होता. तसेच येणाऱ्या विस्तारात मंत्रीपद देऊ, असे ते म्हणाले होते. मात्र, काही तांत्रिक कारण असेल. त्यामुळे अपक्षांना मंत्रीपद देण्यात आलेले नाही. कधी-कधी दोन पावले मागे यावे लागते. त्यामुळे अजूनही त्यांच्या शब्दावर विश्वास आहे, असे बच्चू कडू म्हणाले.
मी तरी मनावर घेत नाही. विविध योजनांसंदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली. मंत्रीपद तर आमचा अधिकार आहे, तो आम्ही मिळवणारच. मात्र सोबतच जनतेची कामेही महत्त्वाची आहेत. विविध कामे आहेत. त्यामुळे हे सरकार अपक्षांशिवाय राहू शकत नाही. मोठी संख्या आहे. त्यांना आमचा विचार करावाच लागेल. राजकारणात गोपनीयता ठेवावी लागते, असे अनेक आमदारांना निमंत्रण न मिळाल्याच्या प्रश्नावर ते बोलत होते. तसेच त्यांनी शब्द दिला आहे. त्यावर आपण ठाम असल्याचेही त्यांनी आपल्याला म्हटल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले आहे.