Shivsena Bhavan Uddhav Thackeray Agitation : बदलापूरला दोन शाळकरी मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचारानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. घटनेच्या निषेधार्थ आज महाविकासाआघाडीकडून मूक आंदोलन करण्यात येत आहे. राज्यभरात ठिकठिकाणी महाविकासआघाडीच्या नेत्यांनी तोंडावर काळी पट्टी बांधत निषेध आंदोलन केले जात आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील शिवसेना भवनाजवळ निषेध आंदोलन केले.
बदलापूर घटनेच्या निषेध नोंदवण्यासाठी राज्यभरात महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून शांततापूर्वक आंदोलन केलं जात आहे. मुंबईच्या शिवसेना भवन परिसरात ठाकरे गटाकडून आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे आंदोलनस्थळी दाखल झाले आहेत. उद्धव ठाकरे हातात काळा झेंडा हातात घेऊन शिवसेना भवन परिसरात आंदोलन करताना दिसत आहेत. यावेळी उद्धव ठाकरेंनी तोंडावर काळा मास्क लावला आहे. तर त्यांच्या दंडावर काळी रिबीनही बांधल्याचे दिसत आहे.
सध्या मुंबईत मुसळधार पाऊस कोसळत आहे. या भर पावसातही ठाकरे गटाचे हे निषेध आंदोलन सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. ठाकरे गटाच्या या निषेध आंदोलनात स्वत: उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे असे संपूर्ण कुटुंब सहभागी झाले आहे. त्यासोबतच संजय राऊत, अनिल देसाई यांच्यासह हजारो शिवसैनिक निषेध आंदोलनात सहभागी झाले आहेत. सध्या शिवसेना भवन परिसरात असंख्य शिवसैनिक या आंदोलनात सहभागी झाल्याचे दिसत आहेत.
या आंदोलनावेळी शिवसैनिकांकडून राज्य सरकारविरोधात मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली. मिंधे सरकारचं करायचं काय?, आम्हाला नको लाडकी बहीण, आम्हाला हवी सुरक्षित बहीण, शिंदे सरकार हाय हाय अशा घोषणा करण्यात आल्या. ठाकरे गटाने केलेल्या या निषेध आंदोलनात असंख्य महिला शिवसैनिक सहभागी झाल्या होत्या. या आंदोलनामुळे शिवसेना भवन परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पाहायला मिळाली.
अजूनही महाराष्ट्रात जिवंत मनं आहेत. ते तुम्ही दाखवून दिलं. जे उद्दाम सरकार घटनाबाह्य सरकार राज्य करत आहे. त्या सरकारची किव येते. नराधमांवर पांघरून घालण्याचं त्यांना पाठिशी घालण्याचं काम सुरू आहे. सरकारने खणखणीत बाजू घ्यायला पाहिजे होती. पण जेव्हा दारं बंद होतात तेव्हा जनतेला रस्त्यावर उतरण्याखेरीज पर्याय नसतो. आपण महाराष्ट्र बंद पुकारला होता. हा बंद कडकडीत झाला असता. याची जाणीव सरकारला झाल्यानंतर एक तर संकटाचा सामना करण्याची यांची हिंमत नाही. निर्ढावलेलं सरकार आहे. राज्यावर राज्य करत आहे. बंद कडकडीत होणार अंदाज आला तेव्हा त्यांचे चेलेचपाटे कोर्टात पाठवले. अन् कोर्टाकडून बंदला अडथळा केला, असे उद्धव ठाकरेंनी यावेळी म्हटले.