आजही तुमचा कट्टर शिवसैनिक, मनसे नेते नांदगावकरांची बाळासाहेब ठाकरेंना आदरांजली

| Updated on: Nov 17, 2019 | 1:00 PM

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनी (Bala Nandgaonkar on Balasaheb Thackeray) स्वतःला कट्टर शिवसैनिक असल्याचं म्हणत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहिली आहे.

आजही तुमचा कट्टर शिवसैनिक, मनसे नेते नांदगावकरांची बाळासाहेब ठाकरेंना आदरांजली
Follow us on

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनी (Bala Nandgaonkar on Balasaheb Thackeray) स्वतःला कट्टर शिवसैनिक असल्याचं म्हणत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहिली आहे. इन्स्टाग्रामवरील आपल्या पोस्टमध्ये ते म्हणाले, “आम्हाला आजही तुमचा कट्टर शिवसैनिक म्हणवून घ्यायला सार्थ अभिमान वाटतो. तुम्ही प्रेमाने, मायेने पाठीवरून फिरवलेला हात आणि वडीलकीच्या नात्याने ऐकवलेले शब्द, तसेच योग्यवेळी दिलेली शाब्बासकीची थाप हे सर्व आठवत आहे.”

बाळा नांदगावकर यांनी (Bala Nandgaonkar on Balasaheb Thackeray) आपल्या पोस्टमध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयीच्या आपल्या भावना मांडताना त्यांच्या निधनाचा दिवस भारतीय राजकारणातील काळा दिवस असल्याचं म्हटलं. ते म्हणाले, “आज 17 नोव्हेंबर आमच्यासारख्या शिवसैनिकांच्या आयुष्यातील आणि भारतीय राजकारणातील काळा दिवस. बरोबर 7 वर्षांपूर्वी आजच्या दिवशी आमच्या दैवताला देवाज्ञा झाली आणि कट्टर शिवसैनिकांबरोबर अखंड महाराष्ट्र पोरका झाला. आपले सर्वांचे लाडके बाळासाहेब गेले. बाळासाहेब 7 वर्षांपूर्वी तुम्ही आम्हाला पोरकं करून निघून गेलात. परंतु तुम्ही दिलेल्या शिकवणी, आदर्श, संस्कार आजही माझ्यासह सर्व शिवसैनिकांनी स्वतःमध्ये जपून ठेवल्या आहेत.”


आयुष्यामध्ये कितीही आव्हानं आली, तरी धीराने त्याचा सामना कसा करायचा, कितीही अडचणी आल्या तरी आपली मुल्ये जपून ध्येय कसं साध्य करायचं हे बाळासाहेबांनी शिकवल्याचंही नांदगावकर यांनी नमूद केलं.

जेव्हा बाहेर वादळ असतं, तेव्हा शांत बसायचं आणि जेव्हा बाहेर वादळ नसतं, तेव्हा वादळ निर्माण करायचं ही शिकवण तुम्ही आम्हाला दिली आहे. संयम कधी सोडायचा याची पण शिकवण तुम्ही दिलीत.

“तुमचा शिवसैनिक तुम्हाला दिलेल्या शब्दाप्रमाणे तुमच्या सावलीसोबत”

बाळा नांदगावकर म्हणाले, “वाटतं कि आत्ता यावं तुमच्याकडे आणि तुमच्यासमोर नतमस्तक व्हावं. हे सर्व लिहीत असताना तुमच्यासोबतचा सहवासातील तो काळ डोळ्यांसमोरून जातोय. तुमच्या आठवणींनी क्षणभर डोळ्यात पाणी उभं राहतंय. आजही हा तुमचा शिवसैनिक तुम्हाला दिलेल्या शब्दाप्रमाणे ठाकरे कुटुंबीयांसोबत आणि तुमच्या सावलीसोबत कायम आहे आणि कायम राहील.”

मात्र, दोघे भाऊ …

नांदगावकर यांनी आपल्या पोस्टमध्ये दोघा भावांचा उल्लेख केला मात्र, त्यापुढे त्यांनी काहीच न लिहिता ते वाक्य अर्धवट सोडलं. यातून त्यांना बाळासाहेबांना काही तरी सांगायचं आहे, मात्र, ते मध्येच थांबले असं दिसत आहे. ते म्हणाले, “आजही हा तुमचा शिवसैनिक तुम्हाला दिलेल्या शब्दाप्रमाणे ठाकरे कुटुंबीयांसोबत आणि तुमच्या सावलीसोबत कायम आहे आणि कायम राहील. मात्र दोघे भाऊ … हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे विनम्र अभिवादन.”