मुंबई : जयदेव ठाकरे यांनी याचिका मागे घेतल्याने दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संपत्तीचा वाद संपुष्टात आला आहे. बाळासाहेबांच्या इच्छापत्राला आव्हान देणारी याचिका जयदेव ठाकरे यांनी मागे घेतली. हा खटला आणखी पुढे नेण्याची इच्छा नाही, असं त्यांनी हायकोर्टाला कळवलं. बाळासाहेब ठाकरेंच्या इच्छापत्राला जयदेव ठाकरे यांनी हायकोर्टात आव्हान दिलं होतं.
मुंबई उच्च न्यायालयातील या खटल्यात शुक्रवारी बाळासाहेबांचे चिरंजीव जयदेव ठाकरे यांनी हायकोर्टात अर्ज दिला. खटला आणखी पुढे नेण्याची इच्छा नाही, त्यामुळे याचिका मागे घेत असल्याचं जयदेव ठाकरे यांनी हायकोर्टाला सांगितलं. याचिका मागे घेतल्याने ठाकरे बंधूंमध्ये बाळासाहेबांच्या संपत्तीवरुन सुरु असलेला वाद संपुष्टात आल्याचं चित्र आहे.
उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या आजारपणाचा फायदा उठवत त्यांची मालमत्ता हडपल्याचा दावा करत जयदेव ठाकरे यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. सुनावणी दरम्यान जयदेव यांनी काही गौप्यस्फोट केल्यानंतर प्रकरणाची सुनावणी ‘इन-कॅमेरा’ करण्यात आली.
”बाळासाहेब त्यांच्या मालमत्तेतील वाटा मला द्यायला तयार होते. ही बाब खुद्द बाळासाहेबांनीच मला सांगितली. मात्र त्यावरून उद्धव आणि माझ्यात वाद नको म्हणून उद्धव यांच्याकडे त्याबाबत वाच्यता न करण्याचंही त्यांनी मला सांगितलं. पण त्याआधीच म्हणजे 2011 मध्ये उद्धवने काही कागदपत्रांवर बाळासाहेबांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या. ती कागदपत्रे कशाबाबत होती हे खुद्द बाळासाहेबांनाही माहीत नव्हतं”, असे जयदेव ठाकरे यांनी सुनावणीदरम्यान हायकोर्टात सांगितलं.