मुंबई: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) यांच्याबरोबर अमेरिकेत राज्यातील मंत्र्यांचा एक दौरा होता. तेव्हा फिरत असताना एक चॉकलेटचा कागद दिसला. यावेळी अजित पवार (ajit pawar) म्हणाले कागद उचला आणि कचऱ्याच्या पेटीत टाका. आम्ही म्हटलं ते आम्ही नाही टाकलं. मग अजित पवार यांनी चॉकलेटचा कागद स्वत: उचलून कचऱ्याच्या पेटीत टाकला होता. हीच खरी संस्कृती, अशा शब्दात राज्याचे महसूल मंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (balasaheb thorat) यांनी अजित पवार यांची स्तुती केली. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये माझी वसुंधरा अभियान 2.0 हे अभियान राबण्यात येत आहे. त्यानिमित्त या अंतर्गत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या स्थानिक संस्था, विभागीय आणि जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी बाळासाहेब थोरात यांनी स्वच्छतेची माहिती देताना हा किस्सा सांगत अजित पवारांचं कौतुक केलं. यावेळी त्यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या कमाचीही स्तुती केली. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेही उपस्थित होते.
आदित्य ठाकरे हे मनापासून काम करत आहेत. ते आम्ही पाहत आहोत. स्वच्छता ही आपली संस्कृती झाली पाहिजे, असं सांगत अमेरिका दौऱ्यावर अजित पवार यांनी रस्त्यावर पडलेला चॉकलेटचा कागद स्वत: कसा उचलून कचरा पेटीत टाकला होता. याची माहिती त्यांनी दिली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही यावेळी आपली भूमिका मांडली. झाड नुसतं उभं राहत नाही. तर त्याची मूळं देखील घट्ट असावी लागतात. ही पारितोषिके केवळ एकट्याची नाहीत, सर्वांची आहेत. आता अचानक आपल्याला पंच महाभूत आठवत आहेत. इतकी वर्षे आपल्याला विकास आठवत होता. काही गोष्टी अशा असतात की त्या वारंवार सांगण्याची आवश्यकता असते. आज झाड दिसतं का? फक्त आठवणी राहिल्या आहेत, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
कोरोनाचं संकट थोडं टळलं होतं. त्यामुळे मी मास्क काढून बोलत होतो. पण आता परत मास्क लावण्याची वेळ आलीय. लॉकडाऊनमध्ये आपण रस्त्यावर मोर देखील पाहिले. आता वट आहे पण पौर्णिमा आहे की माहीत नाही. कोविडच्या लाटेत प्राणवायू काय असते हे याची गरज कळली, असंही त्यांनी सांगितलं. गेल्या अनेक वर्षात आपण विकासाच्या नावावर जे पाप करून ठेवलं. ते एका वर्षात संपणार नाही. आता जमीन काय बोलते हे आपल्याला काही कळत नाही, असंही ते म्हणाले.