मुंबई : मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेच राहतील, असे ठाम वक्तव्य काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी केले आहे. कॅबिटेनच्या बैठकीसाठी आले असता त्यांनी हे वक्तव्य केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोरोना झाल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana patole) म्हणाले. मात्र नंतर काँग्रेसमधून असे समोर आले, की पटोलेंना राज्यपाल असे म्हणायचे होते. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे कॅबिनेट बैठकीला येणार का, असा सवाल बाळासाहेब थोरात यांना विचारला असता, याविषयी काहीही माहिती नाही, असे ते म्हणाले. महाविकास आघाडी उलथून टाकणारी परिस्थिती सध्या राज्यात निर्माण झाली आहे. या राजकीय घडामोडींवर आजच्या बैठकीत चर्चा होणार आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे 46 आमदार असल्याचे बोलले जात आहे.
विधानसभा बरखास्तीच्या दिशेने असे संकेत संजय राऊत यांनी दिले. त्यावर त्यांच्या वक्तव्याचा अर्थ काय, हे त्यांनाच विचारले पाहिजे. विधानसभा बरखास्तीचा विषयच आमच्यासमोर आलेला नाही. त्यामुळे मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करणार कशी, असा सवाल त्यांनी केला. तसेच संजय राऊत यांनी केलेल्या ट्विटवर त्यांनाच विचारायला हवे. उलटसुलट चर्चा होत आहेत. मात्र या केवळ चर्चा आहेत, असेही ते म्हणाले. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधान सभा बरखास्तीच्या दिशेने.. अशा आशयाचे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे.
महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधान सभा बरखास्तीचया दिशेने..
— Sanjay Raut (@rautsanjay61) June 22, 2022
एकनाथ शिंदे यांनी पन्नासच्या वर आमदार पाठीशी असल्याचा दाव केला आहे. यावर विचारले असता, कोण काय दावा करते याला महत्त्व नाही. संख्याबळ आमच्याकडेच आहे. आम्हाला कोणताही धोका नाही. ज्या बातम्या समोर येत आहेत, त्या अत्यंत चुकीच्या आहेत. मंत्रिमंडळ बैठक चांगली होईल, आम्ही चांगले निर्णय घेऊ. आमच्याकडे असलेल्या विषयांवर आजच्या कॅबिनेटमध्ये चर्चा करणार आहोत. दरम्यान, महाविकास आघाडीची सत्ता जाणार, अशा चर्चा होत असताना मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेच राहतील, असे थोरात म्हणाले आहेत.