दैनिक सामनावर बंदी घाला, राहुल गांधी माफी मागा, सदावर्तेंचं म्हणणं काय?

| Updated on: Oct 24, 2022 | 9:22 PM

रश्मी शुक्ला या देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना गुप्तचर विभागाच्या प्रमुख होत्या.

दैनिक सामनावर बंदी घाला, राहुल गांधी माफी मागा, सदावर्तेंचं म्हणणं काय?
सदावर्तेंचं म्हणणं काय?
Follow us on

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपानंतर गुणरत्न सदावर्ते पुन्हा एकदा समोर आलेत. यावेळी त्यांनी दैनिक सामनावर बंदी घालण्याची मागणी केली. राहुल गांधी यांनी केलेल्या भारत-पाकच्या ट्वीटबद्दल थेट माफीची मागणी लावून धरली आहे. एसटी संपानंतर गुणरत्न सदावर्ते यांनी पुन्हा राजकीय आंदोलन पुकारल्याची चर्चा होतेय. यावेळी सदावर्ते यांनी थेट दैनिक सामनावरच बंदी घालण्याची मागणी केली. दैनिक सामनामधून अप्रत्यक्षरित्या रश्मी शुक्ला यांचं खच्चीकरण होत असल्याचं कारण दिलंय. यासंदर्भात आरएनआय कार्यालयाकडं लिहित आहोत. त्यासोबतच राष्ट्रीय महिला आयोगाला तक्रार करत आहोत. राज्यातील गृह मंत्रालयानं याबाबत दखल घ्यावी, अशी मागणही सदावर्ते यांनी केली.

रश्मी शुक्ला या देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना गुप्तचर विभागाच्या प्रमुख होत्या. त्याकाळात राज्यातील अनेक नेत्यांचे फोन कॉल टॅब केल्याचा आरोप त्यांच्यावर झाला. त्यावरून एप्रिल 2022 मध्ये आरोपपत्रही दाखल झालं होतं. सरकार बदलानंतर पुढची कारवाई थांबली आहे. राज्यसरकारच्या संमतीशिवाय पुढील कारवाई बंद करावी, असा अर्ज कोर्टासमोर करण्यात आलाय.

याच प्रकरणी सदावर्ते यांनी दैनिक सामनावर बंदीची मागणी केली आहे. सदावर्ते यांच्या मागणीला ठाकरे गटानं उत्तर दिलंय. सामनावर बंदी कोणी आणू शकत नाही. कारण त्यासाठी न्यायालयीन लढाई लढावं लागेल. ज्याला प्रसिद्धी हवी आहे, त्यानं उद्धव ठाकरे यांच्यावर बोलायचं आणि प्रसिद्धी घ्यायची एवढंच आहे, असं ठाकरे गटाचं म्हणणंय.

सदावर्ते यांनी दुसरी अजब मागणी केली आहे. ती म्हणजे राहुल गांधी यांनी माफी मागण्याची. राहुल गांधी यांनी काल एक ट्वीट केलं. ते असं होतं, पाकिस्तानविरोधातला सामना किती थरारक होता. दबावात हा विजय मिळविला गेला, असंही राहुल गांधी यांनी म्हटलं. यावरून दबावात विजय यावर सदावर्ते यांचा आक्षेप आहे.