हजारो प्रवाशी, ट्रेनचे लहान दरवाजे अन्…. वांद्रे टर्मिन्समधील चेंगराचेंगरीचा सीसीटीव्ही समोर

| Updated on: Oct 28, 2024 | 10:10 AM

वांद्रे टर्मिन्सवर झालेल्या चेंगराचेंगरीत जखमी झालेले बहुतांश प्रवाशी हे उत्तर भारतीय आहेत. हे सर्वजण छट पुजेसाठी उत्तरप्रदेशात जाण्यासाठी ट्रेन पकडत असताना हा अपघात घडला. सध्या रेल्वे प्रशासन आणि पोलिसांकडून या घटनेचा अजून तपास केला जात आहे.

हजारो प्रवाशी, ट्रेनचे लहान दरवाजे अन्.... वांद्रे टर्मिन्समधील चेंगराचेंगरीचा सीसीटीव्ही समोर
Follow us on

Bandra Terminus Stampede CCTV : मुंबईच्या उपनगरीय रेल्वे मार्गावरील प्रमुख स्थानकांपैकी एक असलेल्या वांद्रे टर्मिन्समध्ये चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत 9 प्रवाशी जखमी झाले. या दुर्घटनेत जखमी झालेल्यांना भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यातील दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे. वांद्रे टर्मिन्सवर रविवारी (२७ ऑक्टोबर) सकाळी ही दुर्घटना घडली. आता वांद्रे टर्मिन्समध्ये झालेल्या चेंगराचेंगरीचा सीसीटिव्ही व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत नेमकं काय घडलं हे सर्व पाहायला मिळत आहे.

या व्हिडीओत वांद्रे टर्मिन्सवर प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर मोठी गर्दी झाल्याचे दिसत आहे. वांद्रे टर्मिन्समधून गोरखपूरला जाणाऱ्या अंत्योदय एक्सप्रेसमध्ये चढण्यासाठी प्रवाशांची झुंबड पाहायला मिळत आहे. यावेळी अनेक प्रवाशी त्यांच्या बॅगा आणि सामान घेऊन चढताना दिसत आहेत. यादरम्यान काही प्रवाशी हे गर्दी झाल्याने एकमेकांच्या अंगावर पडले. त्यामुळे मोठी चेंगराचेंगरी झाली.

यावेळी पोलिसांनी ही गर्दी हटवण्याचाही प्रयत्न केला. मात्र प्रवाशांची संख्या जास्त असल्याने पोलिसांना यात यश आले नाही. यादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत 9 जण जखमी झाले आहेत. त्यातील दोन जणांना गंभीर इजा झाली आहे. वांद्रे टर्मिन्सवर झालेल्या चेंगराचेंगरीत जखमी झालेले बहुतांश प्रवाशी हे उत्तर भारतीय आहेत. हे सर्वजण छट पुजेसाठी उत्तरप्रदेशात जाण्यासाठी ट्रेन पकडत असताना हा अपघात घडला. सध्या रेल्वे प्रशासन आणि पोलिसांकडून या घटनेचा अजून तपास केला जात आहे.

2 जणांची प्रकृती गंभीर

मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी 5.56 वाजता वांद्रे टर्मिन्सवर प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर 22921 वांद्रे गोरखपूर ही एक्सप्रेस लागलेली होती. या ट्रेनमध्ये चढण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी झाली होती. यावेळी ट्रेनमध्ये चढत असताना मोठ्या प्रमाणावर चेंगराचेंगरी झाली. त्यात 9 प्रवासी जखमी झाले आहेत. त्यात 2 जणांची प्रकृती गंभीर आहे.

चालत्या गाडीत चढू नका, रेल्वेचे आवाहन

पश्चिम रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी चालत्या गाडीत चढण्याचा किंवा उतरण्याचा प्रयत्न करु नका, असे आवाहन प्रवाशांना केले आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा दिवाळी आणि सुट्टीसाठी मोठ्या प्रमाणात गाड्या सोडण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना आवाहन आहे की त्यांनी संयमाने ट्रेनमधून प्रवास करावा. कोणीही चालत्या गाडीत चढू नये, असेही ते म्हणाले.