नवीन वर्षात हजामत महागणार आहे. केस कापण्यासाठी, दाढीसाठीच नाही तर फेसिअलपासून केसांना रंग देण्यापर्यंत सर्वच सेवांच्या दरात मोठी वाढ होणार आहे. सध्याच्या दरात किमान 20 ते 30 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केशकर्तनालय, ब्युटी पार्लर आणि सलूनमधील दर वाढवण्याचा निर्णय सलून आणि ब्युटी पार्लर असोसिएशनने घेतला आहे. महागाई, जीएसटी आणि परवाना शुल्कातील वाढीमुळे हा निर्णय घेतल्याचा दावा असोसिएशनने केला आहे.
नाभिक संघटनेचा निर्णय काय?
राज्यात सध्या दीड लाखांच्या जवळपास केशकर्तनालय आणि ब्युटी पार्लर आहेत. महागाईचा कहर सुरू आहे. या व्यवसायावर उदरनिर्वाह करणाऱ्या कारागिरांना वाढत्या महागाईला तोंड द्यावे लागत आहे. जे उत्पादनं या व्यवसायासाठी लागतात, त्यावरील जीएसटीमुळे त्यांचे दर वाढले आहेत. तर परवाना शुल्कात पण महापालिकेने वाढ केल्याने या व्यवसायात सेवांचे दर वाढवण्याशिवाय पर्याय नव्हता, असा नाभिक संघटनेने स्पष्ट केले आहे.
20 ते 30 टक्के दरवाढीचा निर्णय
नाभिक संघटनेने महागाई आणि शुल्कावर मात करण्यासाठी केस कापणे, दाढी करण्यासह इतर सर्व सर्व सेवांसाठी 20 ते 30 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून दरवाढीचा बोजा ग्राहकांच्या खिशावर पडणार आहे. यामुळे सर्वसामान्य पुन्हा भरडला जाणार आहे. तर महिलांचा ब्युटी पार्लवरचा खर्च वाढणार आहे.
सध्या सलूनमध्ये केस कापण्यासाठी 100 ते 150 रुपये, दाढीसाठी 50 ते 100 रुपये दर आकारण्यात येतात. एसी सलूनमध्ये हा दर अजून जास्त आहे. तर एकदम हायफाय सलूनमध्ये हा दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. आता या दरवाढीनंतर सलूनमध्ये सुद्धा ग्राहकांना शंभरची कोरी करकरीत नोट पुरणार नसल्याचे बोलले जात आहे. साधी दाढी अथवा केस कापण्यासाठी ग्राहकांना महिन्याला जादा खर्चाची तरतूद करावी लागणार आहे. महिलांना ब्युटी पार्लरची पायरी चढण्यापूर्वी आता चारदा विचार करावा लागणार आहे. आता हजार रुपये सुद्धा किस झाड की पत्ती असा अनुभव त्यांना येणार आहे. सेवांसाठी अधिक दर मोजावे लागणार आहेत.